होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक

डोंबिवली : बेतवड्यातील भीषण आगीत गोडाऊन खाक

Published On: Feb 13 2018 4:48PM | Last Updated: Feb 13 2018 4:49PM



डोंबिवली : वार्ताहर

डोंबिवली जवळच्या संदप-बेतवडे येथील रूनवाल ग्रुपच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत सदर गोडाऊन खाक झाले असले, तरी या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

डोंबिवली जवळच्या ग्रामीण भागातील संदप-बेतवडे येथील रूनवाल या टोलेजंग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्‍या बिल्डिंग मटेरिल, पेंट आणि इलेक्ट्रिक सामनाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तेथील साहित्य आणि अन्य बांधकामांचे साहित्य जळून खाक झाले. सर्वत्र धुर पसरल्याने मोठी दुर्घटना वा स्फोट सारखी घटना घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली होती. घटनास्थळी डोंबिवली फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र गोडाऊनच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तथापी संध्याकाळपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.