Thu, Jun 27, 2019 01:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालकमंत्र्यांचा खड्डे पाहणी दौरा म्हणजे नौटंकी : मनसे 

पालकमंत्र्यांचा खड्डे पाहणी दौरा म्हणजे नौटंकी : मनसे 

Published On: Jul 15 2018 4:40PM | Last Updated: Jul 15 2018 4:40PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेत 22 वर्षे सत्तेत असताना सुद्धा सत्ताधारी  शिवसेना – भाजपा युतीला शहरात चांगले रस्ते देता आले नाहीत. शहरातील खड्ड्यांमुळे मोटारसायकल पडून अपघात होत आहेत. गेल्या १५ दिवसात याच रस्त्यांवरील खड्ड्यांनी लागोपठ 5 जणांचा बळी गेला, तर 2 जण जबर जखमी झाल्यानंतर आता पालकमंत्र्यांना जाग आली आहे. मात्र पालकमंत्र्यांचे खाते असलेल्या एमएसआरडीसीच्या रस्त्यांवरील खड्ड्यात पडल्याने मागून येणाऱ्या ट्रक खाली चिरडून एका महिलेचा बळी गेला आहे. त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असताना शनिवारी त्यांनी कल्याणचा पाहणी दौरा करून पालिकेच्या अधिकाऱ्यांना झापले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे शिवसेनेची नौटंकी असून सत्ताधाऱ्यांना चले जावचा इशारा देण्यासाठी मंगळवारी मनसेच्यावतीने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 1 पालकमंत्री, 1 राज्यमंत्री, 2 खासदार, 3 आमदार आणि तब्बल 100 पेक्षा जास्त सेना-भाजपाचे नगरसेवक आहेत. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सर्वत्र शिवसेना-भाजपाची संपूर्ण सत्ता असताना शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना अजूनपर्यंत निधी आणता आला नाही. 27 गावांचा समावेश झाल्यास 3 वर्षे झाली तरी हद्दवाढ अनुदान राज्य सरकारकडून आणता आला नाही. आज सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, ड्रेनेज, नाले, बीएसयूपीतील घरे, परिवहनच्या बसेस आदी विकासकामे दिसतात, तो सर्व निधी कॉंग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या निधीतून झाला असल्याचा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, राजेश कदम, जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे व कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आदी उपस्थित होते. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. तरीही पावसाळ्यात त्या रस्त्यांना खड्डे पडतातच कसे ? मागील टर्ममध्ये मनसेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात केलेल्या रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची केली, त्यामुळे आजही त्या रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत. दरवर्षी पावसाळा आला कि सेनेच्या नेत्यांचे ठेकेदार येतात, त्यांनाच खड्डे भरण्याचे ठेके दिले जातात. या ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्या पंधरवड्यातच रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात होते. तेच ठेकेदार पुन्हा पावसात खड्डे भरण्याचे काम करतात. पावसाळ्यानंतर पुन्हा हेच ठेकेदार रस्त्यांची दुरुस्ती करतात, असे दुष्टचक्र वर्षानुवर्षे सुरु असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यावेळी केला. मात्र आता नागरिकांची सहनशक्ती संपली आहे. त्या खड्ड्यांच्या रस्त्यावर नागरिकांचे हकनाक बळी जावू लागले असल्याने निष्क्रिय सत्ताधाऱ्यांना अखेरचा चले जाव इशारा देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकाश भोईर यांनी दिली. या मोर्चात कल्याण-डोंबिवलीतील पीडित नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.