होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गॅस सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगीत ५ जण होरपळले

गॅस सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगीत ५ जण होरपळले

Published On: Apr 09 2018 5:23PM | Last Updated: Apr 09 2018 5:23PMडोंबिवली : वार्ताहर

घरगूती गॅस सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगीत 5 जण भाजल्याची घटना कल्याणात घडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच याठिकाणी जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या पाठोपाठ सोमवारी पुन्हा तसाच प्रकार घडल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी परिसरात सोमवारी दुपारी 1 ते दिडच्या सुमारास हा प्रकार घडला. याठिकाणी एकमेकांना अगदी खेटून भंगार खरेदी-विक्रीची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामध्ये काम करणाऱ्यांपैकी मनोज गुप्ता दुपारसाठी जेवण बनवत होता. त्यावेळी अचानक स्फोट होऊन आग लागल्याची माहिती मनोज याने पत्रकारांना दिली. दुकानात सर्वत्र भंगार सामान असल्याने काही क्षणातच आग आजूबाजूला पसरली. तर आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करत आग विझवण्यास सुरूवात केली. या आगीमध्ये मनोजसह आजूबाजूच्या दुकानात काम करणारे पूजन राजभर, सूरज गुप्ता, नंदलाल गुप्ता, जगजीवन राजभर हे चौघेही भाजले आहेत. या पाच जणांवर महापालिकेच्या रूक्‍मीणीबाई रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या आगीमागचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी गॅस सिलेंडर लिक होउन  ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.