होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सव्वा दोन लाख रूपयांचा मासा पाहिला आहे का?

सव्वा दोन लाख रूपयांचा मासा पाहिला आहे का?

Published On: Jan 25 2018 4:07PM | Last Updated: Jan 25 2018 4:07PMडोंबिवली : वार्ताहर

माशाचे (मच्छी) नाव निघाले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र डोंबिवलीतील ‘मत्स्य प्रदर्शनात’ असलेल्या माशाची किंमत ऐकून तुमच्या तोंडाचे पाणी पळाल्याशिवाय राहणार नाही. इथे प्रदर्शनात एक मासा आहे त्‍याची किंमत आहे “सव्वा दोन लाख रूपये. या किंमती माशाला पाहण्यासाठी  प्रदर्शनात लोकांची गर्दी होउ लागली आहे.        

डोंबिवलीत हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी या बंदिस्त क्रिडासंकुलात भरलेल्या अनोख्या ‘मत्स्यप्रदर्शनात’ शेकडो प्रकारचे रंगीबेरंगी, विविध आकारांचे दुर्मिळ मासे ठेवण्यात आले आहेत. आपल्या हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे याठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांची किंमतही फक्त 25 रुपयांपासून सुरू होऊन ती तब्बल 2 लाख 25 हजार रूपयांच्या घरात आहे.

आता तुम्ही म्हणाल की सव्वा दोन लाख रुपये किंमत असणारा हा काय सोन्याचा मासा आहे का ? तर सोन्याचा काही नाही. परंतु हा मासा ज्याच्या घरात असतो त्याची प्रचंड भरभराट होते, असे म्हटले जाते. त्यामुळेच तर दुर्मिळ असणाऱ्या या ‘एरोवाना’ नामक  माशाची किंमत 2 लाखांच्या घरात असल्याची माहिती आयोजक रुपेशकुमार सकपाळ यांनी दिली. या माशाला चीनमध्ये देवासारखे पुजले जाते. चांगल्या, सकारात्मक गोष्टींचे आणि भरभराटीचे प्रतिक म्हणून ‘गॉड ऑफ चायना’ नावाने त्याला ओळखले जाते.

या एरोवाना माशाबरोबरच ट्रॉपिकल फिश, चिकलीड फिश, स्टार फिश, ऑरनामेंटल फिश, जेलिफिश, पारदर्शक मासे, सागरी वनस्पतींसह दुर्मिळ ऑक्टोपसही या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बुधवार 24 जानेवारीपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 28 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. डोंबिवलीत पहिल्यांदाच अशा प्रकारचे मत्स्यप्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून, अधिकाधिक लोकांनी ते पाहण्यासाठी येण्याचे आवाहनही सकपाळ यांनी केले आहे.