होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोन मुलींना स्टेशनवर सोडून निर्दयी बाप पळाला

दोन मुलींना स्टेशनवर सोडून निर्दयी बाप पळाला

Published On: Feb 26 2018 3:48PM | Last Updated: Feb 26 2018 3:58PMडोंबिवली : वार्ताहर

मध्य रेल्वेचे कल्याण जंक्शन हे त्याठिकाणी ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे नेहमीच गजबजलेले असते. अशा या जंक्शनवर रविवारी रात्री साडे आठ वाजता एकजण आला नी त्याने दोघा चिमुकल्या मुलींना सोडून पसार झाला. अवघ्या दोन आणि तीन वर्षांच्या या मुलींनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आपल्या पित्याला ओळखले आहे. सुदैवाने या दोन्ही मुली लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागल्या. अन्यथा गर्दुल्ले किंवा भिकाऱ्यांच्या टोळीच्या हाती लागल्या असत्या तर या दोन मुलींच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस प्रत्येक फलाटांवर गस्त घालत होते. इतक्यात या मुली रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फलाटावर आढळून आल्या. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी या मुलींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. अखेर स्थानक परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. या मुलींना एक व्यक्ती सोडून जात असल्याचे या फुटेजमध्ये आढळून आले. हे फुटेज आणि त्यातील व्यक्तीचा चेहरा मुलींना दाखविण्यात आला. फूटेजमधील व्यक्तीचा फोटा पाहून मुली पापा पापा असे बोलू लागल्या. एकीकडे यावरून सोडून जाणारा दुसरा-तिसरा कुणी नसून तो या मुलींचा बाप असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसरीकडे हा प्रकार पाहून पोलिस देखिल अवाक् झाले. मुली पोलिसांच्या ताब्यात सुखरूप आहेत. पोलीस त्यांची काळजी घेत आहे. असे काय घडले असेल, की ज्यामुळे त्या इसमावर आपल्या मुलींना रेल्वे स्थानकात बेवारस स्थितीत सोडून जाण्याची वेळ आली. एकीकडे सरकार, सामाजिक संस्था मुलगी हवीय तर मुलगी वाचवा, बेटी बचाव असा नारा देत आहे. तर दुसरीकडे आजही मुलींचा दुस्वास आणि तिरस्कार पाहायला मिळतो, हे या घटनेतून समोर आले आहे.

या मुली गर्दुल्ले-भिकाऱ्यांच्या टोळीच्या हाती लागल्या असत्या तर...? 

मुली वयाने खूपच लहान आहेत. रेल्वे स्थानकातील  गर्दीमुळे त्‍यांच्या सुरक्षेला धोका होता. तत्पूर्वी त्या पोलिसांच्या हाती लागल्या म्हणून पुढील अनेक अनर्थ टळले आहेत. मुली इतक्या गोंडस आहेत की त्यांना कुणीही उचलून घेऊन गेले असते. भिकारी-गर्दुल्ल्यांच्या टोळीने पळवून त्यांना भिकेच्या धंद्याला लावले असते किंवा विकून टाकले असते. त्यांना सोडून पळालेल्या निर्दयी बापाचा चेहरा पोलिसांनी सर्वत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. एक ना एक दिवस या मुलींच्या निर्दयी माता-पित्याला मुलींना बेवारस सोडण्याबद्दलचा जाब द्यावा लागणार आहे. या चेहऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनीही चांगलीच कंबर कसली आहे.