Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बहिणीच्या लग्नासाठी तो विसरला माणुसकी

बहिणीच्या लग्नासाठी तो विसरला माणुसकी

Published On: Apr 26 2018 8:06PM | Last Updated: Apr 26 2018 8:06PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-शीळ मार्गावर गुलाबी पुजारी या राहतात. त्यांची चहाची टपरी आहे. ही टपरी चालवून त्या मुलाचा सांभाळ करतात. त्यांचा मुलगा सुधीर याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्याला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यासाठी आईने जीवाचे रान केले. मात्र उपचारासाठी बराच खर्च झाला. चहाची टपरी चालविणाऱ्या गुलाबी पुजारी यांच्याकडे इतकी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी उपचारासाठी  पैसे उधार घेतले. गुलाबी यांनी त्यांचे घरही गहाण ठेवले. घाटकोपर येथील व्यक्तिला त्यांनी हे घर गहाण दिले. त्याच्या बदल्यात त्याच्याकडून आठ लाखाची रक्कम मिळणार होती. घाटकोपर येथे रक्कम घेऊन येण्यास त्यांच्याकडे कामाला असलेला नोकर नवीन यादव याला पाठविले.

दरम्‍यान नवीनने घाटकोपर वरून गाडीने येताना पैसे हरविल्याचा कांगावा केला. तशी तक्रार नवीनने ठाण्याच्या रेल्वे पोलिस ठाण्यात केली. डोंबिवलीला परतल्यावर त्याने गुलाबी यांना पैसे हरविल्याचे सांगितले. तेव्हा गुलाबी यांच्या पोटात गोळाच आला. त्यांना नवीनच्या सांगण्यावर विश्वासच नव्हता. त्यांनी त्याच्यासोबत काय घडले हे सांगण्यासाठी विविध पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच ठाणे रेल्वे पोलिसांकडेही दाद मागितली. पोलिसांनी तिचे काही एक एकून न घेता तिच्या सांगण्याला काडीमात्र महत्व दिले नाही. अखेरीस गुलाबी यांनी कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांच्याकडे धाव घेतली. जॉन यांनी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. अवघ्या 24 तासात नवीनला अटक केली. तो त्याच्या उत्तर प्रदेशातील गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून आठ लाखाची रक्कम हस्तगत केली आहे. या तपासामुळे जॉन यांनी खऱ्या अर्थाने गुलाबी यांच्या तक्रारीला न्याय दिला आहे. तिचे पैसे परत मिळवून दिले आहेत

नवीनच्या बहिणीचे लग्न होते. त्यालाही पैशाची गरज होती. पैशा शिवाय बहिणीचे लग्न कसे होणार या विवंचनेत असलेल्या नवीनने गुलाबी यांनाच शेंडी लावण्याचा विचार केला. त्याने घाटकोपर गाडीने येताना पैसे हरविल्याचा बनाव केला. मात्र क्राईम ब्रँचच्या तावडीत तो अलगद सापडला. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.