Wed, Jul 24, 2019 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : लोकलमधून पडून तरूणाचा मृत्‍यू

डोंबिवली : लोकलमधून पडून तरूणाचा मृत्‍यू

Published On: Apr 11 2018 5:22PM | Last Updated: Apr 11 2018 5:22PMडोंबिवली : बजरंग वाळुंज

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरूणाचा बळी गेला आहे. रजनीश प्रमोद सिंग (वय 30) असे त्या तरूणाचे नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानका दरम्यान तो लोकलमधून खाली पडला. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच, राजनीशच्या मृत्यूने  पुन्हा डोंबिवली हळहळली आहे.

रजनीश सिंग हा डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील शलाका अपार्टमेंटमध्ये राहत होता. परेल येथील सुझूकी मोटर कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता. कल्याण- सीएसटी लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात 8 वाजून 40 मिनिटांनी आली. या लोकलमध्ये रजनीश चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याला लटकून त्याला प्रवास करावा लागला. मात्र डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान रजनीश लोकलमधून खाली पडल्याचे समजताच लोकलमधील प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना कळविले. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात रजनीशच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. गर्दीने भरलेली लोकल स्थानकात येताच जो-तो जिवाच्या आकांताने लोकलमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करतो. या नादात अनेक जण जखमी होतात, तर काहींचे जीवही जातात. हे चित्र सर्वत्र पहायला मिळते. त्याला डोंबिवली सारख्या प्रवाशांनी खचाखच भरलेले शहर देखील अपवाद नसल्याचे वाढत्या अपघातांच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

बुधवारच्या सकाळीच प्रवाशांनी खचाखच भरलेल्या 8:40 च्या डोंबिवलीकडून सुटलेल्या फास्ट लोकलने दरवाजात लोंबकळून प्रवास करणाऱ्या रजनीश याचा डोंबिवली व कोपरच्या दरम्यान ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा त्याच रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या ईगल ब्रिगेड सदस्य अमित मोरे यांनी तात्काळ या अपघाताची माहिती जीआरपीच्या हेल्पलाईनला कॉल करून दिली. तसेच ही माहिती ईगल ब्रिगेड संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांना देखील दिली. विश्वनाथ यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर थोड्याच वेळात जीआरपीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत या घटनेत जखमी झालेला तरूण रजनीश सिंग हा मृत झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विश्वनाथ बिवलकर यांनी वारंवार घडणाऱ्या या घटना बंद व्हाव्यात व त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ट्विटरद्वारे ट्वीट केले. डोंबिवलीतून दररोज लाखो प्रवासी नोकरीसाठी मुंबई व इतर ठिकाणी रवाना होतात. तेव्हा डोंबिवलीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात सर्वात जास्त वाढ होते. अशा या डोंबिवलीतील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा का मिळू नयेत का? असाही सवाल बिवलकर यांनी ट्विटमध्ये केला आहे.