Thu, Nov 15, 2018 10:24



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डम्पिंगची घाण उचला ; नाहीतर निवडणुकीत ठेंगा

डम्पिंगची घाण उचला ; नाहीतर निवडणुकीत ठेंगा

Published On: Mar 25 2018 8:49PM | Last Updated: Mar 25 2018 8:49PM



डोंबिवली : वार्ताहर

कल्याणच्या आधारवाडी-वाडेघर परिसरातील रहिवासी डम्पिंगच्या घाणीने भयंकर त्रस्त झाले आहेत. एकीकडे घाणीचा दर्प आणि दुसरीकडे पेटलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे होणारी घुसमट एका कार्यक्रमाच्या माध्यमातून उचंबळून आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा युतीची गेली 20 वर्षे सत्ता आहे. आमदार आणि खासदार याच पक्षांचे आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना आधारवाडी-वाडेघर डम्पिंग ग्राऊंड येथून अन्यत्र उचलून घेऊन जाण्यात एकाही पक्ष वा त्यांच्या नेत्या-पुढाऱ्यांना यश येत नाही. विरोधी पक्ष देखील हा प्रश्न धसास लावत नाही. डम्पिंगच्या दुर्गंधीने आणि होणाऱ्या रोगराईमुळे आमचे जगणे मुश्कील झाले आहे. अजून किती वर्षे आंदोलने करायची आणि किती वेळा तुम्हाला निवडून द्यायचे ? आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. येत्या निवडणुकीपूर्वीच हा प्रश्न सोडवा. नाहीतर मत मागायला येणाऱ्याला आमचा ठेंगा पाहायला मिळेल. मतदानावरच बहिष्कार टाकू, अशी त्रस्त रहिवाशांनी जाहीर धमकी दिल्याने राजकीय पक्षांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे.

आधारवाडी-वाडेघर डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा सद्याच्या घडीला गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने रविवारी कल्याणच्या वाडेघर रोडवरील लक्ष्मी मंगल कार्यालयात धगधगते डम्पिंग ग्राऊंड आणि धुमसते कल्याण या विषयावर रोखठोक चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर, भाजपाचे गटनेते वरूण पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन पोटे आणि मनसेचे नगरसेवक उपस्थित होते. मात्र पालिका प्रशासानाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने त्याजागी खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी महापालिकेने उंबर्डे येथे 35 एकर जागा संपादित केली आहे. मात्र उंबर्डे येथे नवीन डम्पिंग ग्राऊंड उभारण्यास तेथील शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा विरोध होत असल्याने आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आजपर्यंत बंद होऊ शकले नाही. उंबर्डे येथील जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी आरक्षित होती हे विरोध करणाऱ्या नगरसेवकाला माहिती नव्हते का? त्या जागेचा टीडीआर घेतला गेला आहे, त्यामुळे विरोध करणे योग्य नाही. आता उंबर्डे येथे अनेक गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी उंबर्डे येथे कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यास विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन पोटे यांनी केला.

आज पर्यंत प्रशासन काही करत नाही सांगून सत्ताधारी  शिवसेना आणि भाजपा खापर फोडून आपली जबाबदारी झटकत आहे. जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने तुमच्या हाती पालिकेची सत्ता दिली. मात्र तुम्ही सत्ताधारी असून प्रशासनाच्या हाताखाली काम करीत आहात. प्रशासनावर तुमचा अंकुश नाही. आमचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या प्रयत्नाने एका संस्थेने कचऱ्यावर मोफत प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यातून सत्ताधाऱ्यांना टक्केक्केवारी मिळणार नसल्याने कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा सत्ताधारी प्रशासनाकडून आपण कसल्या अपेक्षा करता ? आधारवाडी डम्पिंग प्रश्न उच्च न्यायालया पर्यंत पोहोचला. न्यायालयाने सगळे पाहून कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांना बंदी केली होती. पण बिल्डरांचे काम बंद होते म्हणून सत्ताधाऱ्यांनी बांधकाम बंदी उठवली. भाजप सेनेची हा प्रश्न सोडवण्याची अजिबात इच्छाशक्ती नाहीच असा घणाघात मनसेचे पवन भोसले यांनी केला.

सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुरा : महासभेत जसे आरोप-प्रत्यारोप करता तसे इथे वागू नका .यापुढे या प्रश्नावर काय करणार ते सांगा, अशा शब्दात नागरिकांनी उपस्थित नगरसेवकांना ठणकावले. त्यावेळी उंबर्डे येथे डम्पिंग ग्राऊंड हलविण्यासाठी जो विरोध होत आहे. त्याची जनसुनावणी घेण्यात आली आहे. तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर पर्यावरण विभागाची परवानगी मिळवावी लागेल. ती परवानगी मिळाल्यानंतर नवीन डम्पिंग ग्राऊंड सुरू करता येईल, असे स्पष्टीकरण भाजपाचे वरुण पाटील cयांनी दिले. तर आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र या डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेला कचरा काढण्यासाठी 7 वर्षे लागतील. त्यामुळे तेथे नवीन कचरा टाकणे बंद होणे गरजेचे आहे. अनेक सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. सुक्या कचऱ्यातील कागद, काच, लोखंड, आदी भंगारवाल्याकडे दिले जाते. तसे सर्वच सोसायट्यांमध्ये झाले पाहिजेत. त्यामुळे कोणताच कचरा डम्पिंग ग्राऊंडवर येणार नाही, यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. तरच हा प्रश्न सुटून आपले शहर स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याचे शिवसेनेचे प्रकाश पेणकर यांनी सांगितले.