Fri, Jul 10, 2020 20:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोसायटीच्या वादातून डॉक्‍टरांना मारहाण

सोसायटीच्या वादातून डॉक्‍टरांना मारहाण

Published On: Dec 31 2017 5:30PM | Last Updated: Dec 31 2017 5:30PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

सोसायटी मेंटेनन्स थकबाकी वसूलीच्या वादातून पाच-सहा जणांनी मिळून एका डॉकटरवर क्रिकेट स्टंप व लाकडी दांडक्याने मारहाण केल्‍याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. या हल्ल्यात डॉक्टर थोडक्यात बचावले. मात्र जीवावर आले होते ते हाता-पायावर निभावले. पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डोंबिवली पूर्वेकडे रामनगर परिसरातील समर्थ पॅलेस इमारतीमध्ये डॉ. प्रकाश देशमुख हे आपल्या कुटुंबासह राहतात. या इमारतीमध्ये राहणारे काही जण सोसायटीच्या थकबाकीचे पैसे भरत नाहीत. परिणामी सोसायटीच्या सदस्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. हा वाद शनिवारी दुपारी उफाळून आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डॉ. देशमुख हे दुचाकीने घरी आले. दुचाकी इमारतीच्या आवारात पार्क करत असताना वरून कुणीतरी "डॉक्टर आला रे आला" असे ओरडले. डॉ. देशमुख यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सात ते आठ जण खाली उतरले. या टोळक्याने लाकडी दांडक्याच्या साह्याने डॉ. देशमुख यांना झोडपून काढले. हल्लेखोरांच्या तावडीतून त्यांनी कशीबशी सुटका करवून घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यात डॉ. देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. यात  हात, पाय आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी आशिर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सद्या ते अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मारहाण करणाऱ्यांपैकी काही जण क्रिकेटचे स्टंप व लाकडी दांडके घेऊन पळताना सोसायटीच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलीसांनी वसंत म्हात्रे, आशा म्हात्रे, मुलगा प्रकाश म्हात्रे व त्यांची मुली विरोधात गुन्हा दाखल केला. डॉ. प्रकाश देशमुख यांच्या पत्नी डॉ. हेमा देशमुख यांनी बोलताना  ज्यांनी डॉक्टरांवर हल्ला केला त्यांचे सोसायटीचे पैसे वर्षानुवर्षे थकीत आहेत. डॉ. देशमुख हे सोसायटीचे पदाधिकरी असल्याने त्यांनी थकबाकी मागितली होती. त्यामुळे  डॉक्‍टरांना मारहाण करण्यात आली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर्सही आदल्या दिवशी रात्रीच कापण्यात आल्या आहेत. हल्लेखोर आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. तर वसंत म्हात्रे यांनी देखील डॉ. देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आपल्या पत्नी व मुलीला शिवीगाळ केल्याचा आरोप म्हात्रे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी डॉ. देशमुख व त्यांची पत्नी डॉ. हेमा देशमुख या दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती दिली. तपास सुरू असून, संबंधितांवर आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.