Mon, Nov 19, 2018 02:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुत्र्यांचे फोटो लावून बॅनरबाजांना चपराक

कुत्र्यांचे फोटो लावून बॅनरबाजांना चपराक

Published On: Apr 17 2018 7:59PM | Last Updated: Apr 17 2018 7:59PMडोंबिवली : वार्ताहर

निवडणूक, सण, उत्सव, यात्रा असो वा नसो कोणीही उठतो आणि गल्लोगल्ली, नाक्यांवर नेत्यांना (भाऊ,साहेब,दादा,काका,मामा,नाना इ.) शुभेच्छा देणारे बॅनर लावतो. फाळकूट दादांच्या कार्यकर्ते मंडळींच्याकडून असे पोस्टर लावले जातात. यामुळे शहरातील महत्‍वाचे चौक, रस्‍ते अशा पोस्‍टरमुळे झाकोळून जातात. या पोस्‍टरबाजीला आणि बॅनरला कंटाळलेल्‍या शहरातील नागरिकांनी आज अनोखे पोस्‍टर उभारून पोस्‍टरबाजांना जरा हटकेच संदेश दिला.

महाराष्‍ट्रातील अनेक शहरात आज युवा नेते, दादा, भाई, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे डिजीटल फलक उभारले जातात. या निमित्‍ताने शहरात बॅनर लावण्याची जणू स्‍पर्धाच सुरू होते. मग अशा या पोस्‍टरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. अशा पोस्‍टर आणि बॅनरला कंटाळलेल्‍या कल्याणकरांनी नामी शक्कल लढवीत आपला राग व्यक्त केला. 

कल्‍याणकरांनी आज चक्क एका मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर कल्याणच्या पूर्वेकडील नेतवली नाका परिसरात लावले. या बॅनरची आज मंगळवारी दिवसभर चर्चा रंगली होती. त्‍यात मग सोशल मीडिया कसा मागे असेल, या बॅनरचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटले. या मॅक्सभाईला जेष्ठ उद्योगपती टायसन भाई, युवा नेता डेंजर भाई, उद्योगपती प्रिन्सभाई, समाजसेवक मेरूभाई आदींचे शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत.

या फलकाच्या माध्यमातून नेते आणि भाई, दादा लोकांची चांगलीच खिल्ली उडवली असून हे बॅनर कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. त्रस्त झालेल्या कल्याणकरांनी कुत्र्याच्या वाढदिवसाचे बॅनर उभारून शहर विद्रुप करणाऱ्यांवर असा अनोख्या पद्धतीने राग व्यक्त केला. या बॅनरच्या माध्यमातून दादा, भाई, काकांना चांगला झोंबणारा संदेश मिळाला आहे. हे बॅनर पाहणाऱ्या नेत्या-पुढाऱ्यांना मनोमन लाज वाटली पाहिजे, असाच संदेश यातून देण्याचा प्रयत्न कल्याणकरांनी केला आहे.

Tags : dombivali, digital flex, against, kalyan ,people, innovative, protest,