Thu, Jul 18, 2019 04:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घराचे आमिष दाखवून लाखोंना गंडा

घराचे आमिष दाखवून लाखोंना गंडा

Published On: Jan 09 2018 6:38PM | Last Updated: Jan 09 2018 6:38PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

घराचे आमिष दाखवत दोन बांधकाम व्यवसायिकांनी एका इसमाला तब्बल 28 लाख 18 हजार 750 रुपयांना गंडा घातल्याची घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार दर्शन गांधी व लोकग्राम ग्रुपच्या संचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्व काटेमानवली येथील सुनिक सोसायटी मध्ये राहणारे विवेक सांगळे यांना कल्याण मधील प्रसिद्ध असलेले लोकग्राम ग्रुपचे बिल्डर दर्शन गांधी व लोकग्राम ग्रुपच्या संचालकांनी पुर्वेकडील लोकग्राम संकुलमधील गायत्री इमारतीमध्ये तिसऱ्या माळ्यावर 805 चौरस फुटाचे घर बांधून देतो, असे आश्वासन दिले होते. सांगळे यांनी 20 मे 2013 रोजी दर्शन गांधी यांना 15 लाख रुपये चेकच्या माध्यमातून दिले. त्यानंतर 24 मे रोजी सांगळे यांनी आपल्या पत्नीच्या नावाने तयार केलेला सव्वा पाच लाखांचा चेक दिला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने एकूण मिळून 28 लाख 18 हजार 750 रुपयांचा चेक दिला. मात्र पैसे देऊनही घर दिले नाही. याबाबत विचारणा केली असताना सदर बिल्डरने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे सांगळे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सांगळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दर्शन गांधी व लोकग्राम ग्रुपच्या संचालका विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.