Sat, Jun 06, 2020 08:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगाव हिंसाचाराचे कल्याण-डोंबिवलीत पडसाद

भीमा कोरेगाव हिंसाचाराचे कल्याण-डोंबिवलीत पडसाद

Published On: Jan 02 2018 6:50PM | Last Updated: Jan 02 2018 6:50PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद कल्याण-डोंबिवलीच्या काही भागात उमटले. डोंबिवलीच्या शेलार नाक्यावर रस्त्यावरून धावणारी काही वाहने फोडण्यात आली. त्यामुळे पोलिसांना हल्लेखोर जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर कल्याणमध्ये रिक्षा आडवी लावून काहींनी एसटी बस फोडली. 

भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी सकाळी मोर्चा काढला. कोळसेवाडी, श्रीराम टॉकीज, पूना लिंक रोड या परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली. सदर मोर्चा कल्याण पूर्व परिसरात फिरत होता.

या मोर्चातील आंदोलकांनी भिमा कोरेगांव येथे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीचा निषेध व्यक्त केला. तसेच याला जबाबदार असलेल्या संबंधीतांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत क्षेत्रात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. कल्याणच्या पत्रीपूलाजवळ देखिल आंबेडकरी अनुयायांनी एकत्र जमून निषेधाच्या घोषणा दिल्या. तर काही परिसरात दुकानही बंद ठेवण्यात आली होती. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री कल्याणमध्ये एसटी बस फोडण्यात आली. वालधुनी सर्कलजवळ एम एच 14 / बी टी / 3031 क्रमांकाची एसटी वळण घेत होती. इतक्यात या बसला रिक्षा आडवी घालण्यात आली. हातात झेंडे, रॉड, दगड घेऊन आलेल्या 4 - 5 जणांच्या टोळक्याने या बसवर हल्ला चढविला. यात भगवान बुधवंत (वय 53) या चालकासह एकजण जखमी झाला. हल्लेखोरांची नावे पोलिसांना समजली आहेत. महात्मा फुले चौक पोलिसांनी बस चालक भगवान बुधवंत यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून कार्तिक ज्ञानदेव जोंधळे (23) याला ताब्यात घेतले. त्याचा मित्र देवीदास काऊतकर याच्यासह अन्य 2 - 3 फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. तर डोंबिवलीच्या पूर्वेतील कल्याण रोडला असलेल्या शेलार चौकात मंगळवारी रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास 100 - 150 जणांच्या जमावाने निषेधाच्या घोषणा देत अचानक रस्त्यावर उतरून ये - जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक सुरू केली. या जमावाने पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जवळपास 10 - 12 वाहने फोडली. यात जमावाने प्रामुख्याने कार सारख्या वाहनांना लक्ष केले. याची माहिती कळताच परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर, टिळकनगर पोलिस ठाण्याचे वपोनि शिवाजीराव धुमाळ यांच्यासह पोलिसांच्या मोठा फौजफाट्याने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात शांततेचे आवाहन करत संचलन केले. डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही परिसरातील नागरिकांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्यास पोलिसांना सहकार्य केले. या परिसरात 4 व्हॅन, पीसीआर मोबाईल व्हॅनसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांपैकी काहींची नावे पोलिसांना समजली आहेत. सरकारतर्फे फौजदार विलास कुटे यांच्या फिर्यादीनुसार डोंबिवली पोलिसांनी राजू ढोले, विजय तारणे, गोरख, वर्षा वाघमारे, धांगड्या आणि 100 ते 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.