होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

लोकलमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

Published On: Feb 23 2018 4:14PM | Last Updated: Feb 23 2018 4:13PMडोंबिवली : प्रतिनिधी

गुरूवारी रात्री डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्र. 3 वर मोठा गलका झाला. तेथे कल्याणहून येऊन थांबलेल्या एका लोकलमध्ये गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होउ लागल्‍या होत्‍या. यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्‍यान या महिलेने लोकलमध्येच गोंडस बाळाला जन्म दिला. यावेळी लोकलच्या डब्यातील  प्रवाश्यांपैकी अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी महिलेला तिच्या नवजात बाळासह पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

नाशिकमध्ये राहणारी रूपाली आंबेकर ही महिला गरोदर असल्याने ती कल्याणच्या वालधुनी येथे आपल्या माहेरी आली आहे. तिच्यावर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याच दरम्यान पोटात दुखू लागल्याने गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास तिचे वडील तिला डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास निघाले. त्यांनी 9 वाजून 20 मिनीटांनी कल्याण येथून लोकल पकडली. मात्र या लोकलने कल्याण स्थानक सोडताच रूपालीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. दरम्‍यान रूपालीने काही क्षणातच एका गोंडस बाळाला जन्म दिला. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी मदतीसाठी सदर लोकलमध्ये धाव घेत रूपालीसह तिच्या बाळाला शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रूपाली आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत. गर्भवती रूपालीला हॉस्पिटलमध्ये नेणारे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल के. व्ही. राजपूत व डी. एल. जगदाळे या दोघांचे रूपाली आणि तिच्या कुटुंबाने आभार मानले आहेत.