Sun, Aug 25, 2019 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाचखोर अतिरिक्त आयुक्तासह तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

लाचखोर अतिरिक्त आयुक्तासह तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

Published On: Jun 14 2018 6:18PM | Last Updated: Jun 14 2018 6:18PMडोंबिवली : वार्ताहर

अनधिकृत इमारतीवर कारवाई न करण्यासाठी 8 लाखांची लाच स्वीकारताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्याच्या दोन साथीदारांना काल अटक करण्यात आली होती. आज  गुरुवारी यांना येथील कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने या तिघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बुधवारी दुपारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह दोन लिपिकांना 27 गावांतील एका बिल्डरकडून अनधिकृत इमारतीवर कारवाई न करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. संजय घरत (वय 51) यांच्यासह ललित दशरथ आमरे (42, लिपिक), भूषण बळीराम पाटील (27, लिपिक) यांनी सदर बिल्डरकडे 42 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 35 लाख रुपये देण्याचे सदर बिल्डरने मान्य केले होते. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 8 लाख रुपये स्वीकारताना तिघांना बुधवारी दुपारी रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी घरत आणि दोघा लिपिकांची घरत यांच्या केबिनमध्ये 17 तास चौकशी करण्यात आली. रात्रभर घरत यांची चौकशी सुरू होती. रात्री त्यांच्या डोंबिवलीच्या निवासी विभागातील मिलापनगर येथील घरी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर सकाळी 8 वाजता या सर्वांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथून गुरुवारी दुपारी त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले. घरत, आमरे, व पाटील या तिघांना न्या. डी. एम. हातरोठे यांच्या न्यायालयात हजर केले असता, तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी हे करीत आहेत.