Tue, Jul 23, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला खंडणीखोरीत अटक

प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला खंडणीखोरीत अटक

Published On: May 24 2018 8:23PM | Last Updated: May 24 2018 8:23PMडोंबिवली : वार्ताहर

आपल्या स्वच्छ प्रतिमेने संपूर्ण देशभरात आपली प्रतिमा तयार करणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या महाराष्ट्र संघटकाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. सुनील शिरसकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील एका हॉस्पिटलचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करत कारवाईची धमकी देत संबंधित डॉकटर कडे दहा लाखांची खडणी मागितली होती. त्यातील 2 लाखांचा हपता घेताना त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ बेड्या ठोकल्याने खळबळ माजली आहे.

काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये आयोजित आमदार बच्चू कडू यांच्या कार्यक्रमासाठी त्याने डॉकटरकडून 40 हजार रुपये घेतल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलने व स्वच्छ प्रतिमेमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करत जनमानसात आपले स्थान निर्माण केले. कडू यांच्या प्रहार संघटनेमार्फत कडू यांनी अनेक आंदोलने केली. या संघटनेच्या शाखा ही आता गावोगावी विखूरल्या आहेत. कल्याणमध्ये कार्यरत असलेल्या प्रहार संघटनेचा महाराष्ट्र संघटक सुनील शिरसकर याने मात्र या प्रतिमेला छेद दिला आहे. कल्याण-कसारा मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशन जवळ गणपती हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या चौथा मजला अनधिकृत असल्याचे सांगत त्याने तक्रार व कारवाईची भीती दाखविली. सदर रुग्णालयाचे डॉक्टर ए. बी. धोनी यांच्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची खडणी मागितली. इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये आयोजित केलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या कार्यक्रमासाठी त्याने डॉक्टर धोनी यांच्याकडून 40 हजार रुपये उकळले होते. याबाबत डॉ. धोनी यांनी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी रात्री खंडणी विरोधी पथकाने रात्री सापळा लावून शिरसकर याला 2 लाखांचा हप्ता घेताना बेड्या ठोकल्या. गुरुवारी खंडणीखोर शिरसकर याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे फर्मान सोडले. शिरसकर याने आतापर्यंत असे किती गुन्हे केले आहेत. त्याचे आणखी कुणी साथीदार आहेत का. कुणाच्या इशाऱ्यावरून खंडणीखोरी केली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिस त्याची  चौकशी करीत आहेत.