होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्रकाराच्या कारमधुन एक लाख रूपयांची बॅग लंपास

पत्रकाराच्या कारमधुन एक लाख रूपयांची बॅग लंपास

Published On: Dec 24 2017 4:56PM | Last Updated: Dec 24 2017 4:55PM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात चोर-भामट्यांचा प्रचंड उच्छाद असून, पाळत ठेवून नागरिकांसह वाहनचालकांचे या न त्या कारणाने लक्ष विचलित करून त्यांच्या जवळील रोकड, ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याचाच फटका कल्याणातील एका पत्रकारालाही बसला. लक्ष विचलित करत भामट्यांच्या टोळक्याने या पत्रकाराच्या कारमध्ये सीटवर ठेवलेली एक लाख रोकड, कॅमेरा इतर साहित्य असलेली बॅग लंपास केल्याने पत्रकार मंडळींमध्ये खळबळ उडाली आहे.  

संदेश शिर्के असे चोरट्यांची शिकार झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पत्रकार शिर्के हे त्यांच्या कारने कल्याण स्टेशन परिसरातल आले. स्कायवॉक खाली कार उभी करुन सीमकार्ड घेण्यासाठी ते समोरच्या दुकानात गेले. सीम कार्ड घेऊन पुन्हा कारमध्ये बसले असताना एकाने त्यांच्या कारची काच वाजवून खाली काही तरी पडले असल्याची बतावणी केली. यामुळे पत्रकार शिर्के कारमधून खाली उतरले व खाली पाहू लागले. कारच्या पुढील टायरजवळ रस्त्यावर 10 रुपयांच्या काही चलनी नोटा पडल्याचे दिसले. त्या नोटा उचलत असल्याची संधी साधत भामट्यांच्या टोळक्याने क्षणार्धात कारचा दरवाजा उघडून बॅगसह पोबारा केला. याच दरम्यान शिर्के पुन्हा कारमध्ये बसताना अचानक त्यांचे पाठीमागच्या सीटवर लक्ष गेले. तेव्हा तेथे ठेवलेली बॅग त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे शिर्के यांना बॅग कुणीतरी लांबविल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या त्या बॅगेत एक कॅमेरा व इतर साहित्यासह एक लाखांची रोकड होती. चोरांच्या कारनाम्याचा फटका पत्रकाराला बसल्‍याचे समजताचं पोलिसांसह अनेक पत्रकार मंडळी घटनास्थळी धावून आली. पोलिसांनी कारची पाहणी केली. पत्रकार शिर्के यांच्या जबानीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी तक्रार दाखल केली. नोटा खाली पडल्याची बतावणी करणाऱ्याचे वर्णन शिर्के यांनी पोलिसांना दिले. त्यांच्या या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. 

दरम्यान एकीकडे भामट्यांच्या लुटमारीचे कारनामे कल्याण-डोंबिवलीतील पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून वाढल्याचे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे भामटेगिरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस यंत्रणाही वाढत्या गुन्ह्यांमुळे चक्रावली आहे. आता पोलीसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे.