Wed, Apr 24, 2019 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलमधील महिला प्रवाशांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

लोकलमधील महिला प्रवाशांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

मुंब्र्याच्या पारसिक बोगद्यातून धावणाऱ्या जलद लोकलला लक्ष करणाऱ्या त्या भागातील उन्मत्त समाजकंटकांकडून महिलांच्या डब्यांवर धारदार अवजड वस्तू, दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून त्यांना जखमी करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सगळ्या प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांत दोन प्रवासी महिलांना लक्ष करण्यात आले असून धारदार आणि अवजड वस्तू फेकून गंभीररित्या जखमी करण्यात आलेल्या या महिलांवर उपचार सुरू आहेत.

मध्य रेल्वेच्या पारसिक बोगद्याच्या परिसरामध्ये झोपडपट्ट्यांमधून होणाऱ्या दगडफेक आणि कचराफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भागामध्ये संरक्षण भिंत उभारण्याबरोबरच या भागामध्ये गस्त वाढवण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. या भागामधील झोपडपट्ट्यांमधून वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना दुखापत होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.    

डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या कोळी या वडाळा येथील एमटीएनएल कार्यालयात नोकरी करतात. त्या मंगळवारी बदलापूर जलद लोकलने डोंबिवलीच्या दिशेने येत होत्या. मुंब्र्याच्या पारसिक बोगद्यातून लोकल जात असताना बोगद्यापासून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने लोखंडी रॉड सारखी अवजड वस्तू वेगाने महिला डब्याच्या दिशेने भिरकावली. यामध्ये विद्या कोळी या जबर जखमी झाल्या. त्यात त्यांचा पाय निकामी झाला आहे. डोंबिवलीतील प्रवासी प्राजक्ता व इतर महिलांनी जखमी विद्या कोळी यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पायाच्या घोट्यावरील भागात फ्रॅक्चर झाले असल्याने विद्या यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायात सळई (रॉड) टाकण्यात आली आहे. असाच प्रकार गुरुवारी संध्याकाळी पारसिक बोगद्याजवळ घडला होता. त्यात भावना नावाच्या प्रवासी तरूणीवर काचेच्या बाटलीने हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जखम झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी त्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, बोगद्यावरील दगडफेक्यांना आवर घालावा, हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी महिलां प्रवाशांकडून पुढे आली आहे.

विशेष म्हणजे सायंकाळच्या वेळी घडणाऱ्या या घटनांमुळे महिलावर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या तेजस्वी महिला संघटनेने या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर या संदर्भामध्ये एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पारसिक परिसरात संरक्षण भिंत उभारणे, परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, संयुक्त पेट्रोलिंग आणि जनजागृतीचे आदेश राज्यमंत्र्यांकडून देण्यात आले. राज्याचे पोलिस महासंचालक, ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त, लोहमार्ग पोलिस आयुक्त, मध्य रेल्वेचे पोलिस महानिरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलास या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने उन्मत्त हल्लेखोरांचा मनसुभा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे या दोन्ही घटनांवरून स्पष्ट होत आहे.

Tags : dombivali, Increased, attacks,women passengers, local trains,


  •