Sun, Mar 24, 2019 12:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २५ लाखांच्या दोन दुर्मिळ मांडूळांसह ३ तस्कर जेरबंद

२५ लाखांच्या दोन दुर्मिळ मांडूळांसह ३ तस्कर जेरबंद

Published On: Mar 23 2018 3:43PM | Last Updated: Mar 23 2018 3:43PMडोंबिवली : वार्ताहर

काळी जादू व माणसाच्या दुर्धर आजारावरील औषधासाठी उपयोगी असणाऱ्या मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या तिघा तस्करांना क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण-शिळ मार्गावरील काटई टोल नाक्याजवळ लावलेल्या सापळ्यात हे तस्कर क्राईम ब्रँचच्या सापळ्यात अडकल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली. या त्रिकुटाचा आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नवनाथ विश्वास दायगुडे (वय 24, रा. मु. तरडोली, बारामती), कृष्णा अनवती पारटे (35, मु. साखर शिवाजी चौक, पोलादपूर) आणि प्रवीण पांडुरंग चव्हाण (29, रा. भैरवनाथ नगर, पोलादपूर) अशी अटक केलेल्या तिघा मांडूळ तस्करांची नावे आहेत. या त्रिकुटाकडून क्राईम ब्रँचने 25 लाख रुपये किंमतीचे पिवळसर-तपकिरी रंगाचे दोन दुर्मिळ मांडूळ जप्त केले आहेत. कल्याण-शिळ मार्गावरील काटई टोल नाक्याजवळ मांडूळ सर्पाचे तस्कर येणार असल्याची खबर कल्याण युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्यासह दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, हरिश्चंद्र बंगारा, प्रकाश पाटील, या पथकाने काटई नाक्यावर गुरूवारी रात्री सापळा रचला होता. स्कॅार्पिओ गाडीतून आलेल्या या त्रिकुटाला संशयावरून ताब्यात घेतले. या गाडीत प्लास्टिकची गोणी आढळून आली. तिची झडती घेतली असता दोन दुर्मिळ जातीचे मांडूळ सर्प त्यात आढळून आले. पोलिसांनी तस्कर नवनाथ, कृष्णा व प्रवीण या तिघांना ताब्यात घेऊन त्यांचीही झडती घेतली. नवनाथ दायगुडे हा बारामती परिसरात राहणारा असला तरी त्याचा संपर्क पोलादपूरच्या कृष्णा अनवती याच्याशी कसा आला. नवनाथ याने हे दुर्मीळ सर्प कोठून आणले. प्रवीण चव्हाण याच्या स्कॅर्पिओ गाडीतून आणखी काही  सर्पांची वाहतूक करण्यात आली आहे का?  मांडूळांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात येणार होते का ? यापूर्वी असे व्यवहार झाले आहेत का ? यामागे तस्करांची मोठी टोळी आहे का तसेच हे सर्प त्रिकुटाने नेमके कोठून व कशासाठी आणले, या सगळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे या तीघांसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचे वपोनि संजू जॉन यांनी सांगितले.

मांडुळ जातीच्या सापांच्या अंगातील द्रव्य औषधासाठी उपयोगी पडत असल्याने औषध कंपन्यांकडून हे द्रव्य काढल्यानंतर त्याच्यापासून औषधे बाजारात विकली जाते. तसेच मांडूळ जातीच्या सापाची काळ्या जादूच्या नावाखालीही तस्करी केली जाते. जप्त केलेल्यांपैकी 4 फूट लांबीच्या एका सापाचे वजन 1 किलो 850 ग्रॅम असून त्याची किंमत 14 लाख रूपये इतकी आहे. तर 3 फूट लांबीच्या दुसऱ्या सापाचे वजन 850 ग्रॅम इतके असून त्याची किंमत 11 लाख रूपये इतकी आहे. या प्रकरणी हवालदार दत्ताराम भोसले यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी या तस्करांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39 (ड) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या दुर्मिळ सापाला डोंबिवलीतील सर्पमित्र वैभव कुलकर्णी यांच्याकडे सुरक्षितपणे ठेवले आहे. नंतर हे सर्प त्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलप्रदेशात सोडण्यात येणार आहेत.