होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 7 महिन्यांच्या बाळाने गिळलेला बल्ब 2 मिनिटांत काढला

7 महिन्यांच्या बाळाने गिळलेला बल्ब 2 मिनिटांत काढला

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी

नशीब बलवत्तर असले की, मृत्यूच्या दारातूनही मनुष्य परत येतो, या म्हणीचा प्रत्यय नुकताच चिपळूण येथील 7 महिन्यांच्या बालिकेच्या बाबतीत आला. खेळता-खेळता नकळत तिने गिळलेला 2 सें.मी.चा एलईडी बल्ब वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवघ्या दोन मिनिटात तिच्या फुफ्फुसातून यशस्वीरीत्या काढून तिला जीवदान दिले.

चिपळूणमध्ये राहणार्‍या 7 महिन्यांच्या अरिबाने खेळता-खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. तिने दोरा किंवा मोबाईलची पिन गिळली असावी, असा समज तिच्या पालकांना झाला. काही दिवसांनी तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागल्याने तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले; पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले. त्यानंतर आठवड्याभराने त्यांनी अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कुठलाही वेळ न दवडता तपासणी करून ब्लॉन्कोस्कोपीने अगदी 2 मिनिटांत हा बल्ब बाहेर काढण्यात यश आले.

बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमधील ईएनटी (कान-नाक-घसा) विभागाचे प्रमुख डॉ. दिव्या प्रभावत म्हणतात, सुरुवातीला काही दिवस तिला प्रतिजैविके देण्यात आली आणि जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली गेली तेव्हा तो बाह्यघटक बरेच दिवस तिथे राहिल्याने संपूर्ण फुफ्फुसामध्ये कणिका ऊती (ऊतीचे कण) आढळून आली. हा संसर्ग काढून टाकण्यासाठी इंट्राव्हेनस (थेट नसेमधून) प्रतिजैविके आणि स्टेरॉईडस् देण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ब्रॉन्कोस्कोपी केली आणि दोन मिनिटांत हा बाह्यघटक (स्कोपमधून केवळ एक वायर दिसत होती) फोरसेप्सचा वापर करून काढण्यात आला. आश्‍चर्य म्हणजे तो 2 सेंटिमीटरचा एलईडी बल्ब होता. अरिबाचे वडील म्हणतात, माझ्या मुलीचा जीव वाचवल्याबद्दल मी वाडिया हॉस्पिटलमधील टीमचा अत्यंत आभारी आहे.