Sun, Jul 21, 2019 12:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘जेजे’तील निवासी डॉक्टरांना बेदम मारहाण

‘जेजे’तील निवासी डॉक्टरांना बेदम मारहाण

Published On: May 20 2018 1:51AM | Last Updated: May 20 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील जेजे रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यात एका डॉक्टरला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

डॉक्टरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे जे.जे. समूहातील 400 निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करत संप पुकारला. या संपामुळे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे मात्र प्रचंड हाल झाल्याचे चित्र जे.जे. रुग्णालयात पाहायला मिळाले.

रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 11 मध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका रुग्णाच्या चौघा नातलगांनी अचानक दोन निवासी डॉक्टरांना लक्ष्य केले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याची व कागदपत्रांची नासधूस केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. 

जे. जे. समूहातील गोकुळदास तेजपाल, कामा रुग्णालय, सेंट जॉर्ज या रुग्णालयांतील मार्ड डॉक्टरांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत रुग्णालयात अलार्म सुविधा उपलब्ध करुन दिली जात नाही, तोपर्यंत एकही डॉक्टर कामावर जाणार नाही. शिवाय प्रत्येक वॉर्डच्या दरवाजात एक एक सुरक्षा रक्षक नेमल्याशिवाय कुणीही काम करणार नसल्याचेही मार्ड संघटनेने जाहीर केले.