Mon, Apr 22, 2019 16:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या शहापूर तालुका उपप्रमुखाची भिवंडीत हत्या

शिवसेनेच्या शहापूर तालुका उपप्रमुखाची भिवंडीत हत्या

Published On: Apr 21 2018 1:38AM | Last Updated: Apr 21 2018 1:38AMभिवंडी : वार्ताहर

पोटनिवडणुकीच्या वादातून अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांच्या झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच भिवंडी तालुक्यातील देवचोळे येथे शहापूर शिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे (40, रा. अघई) यांची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून शैलेश यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न हल्लेखोरांनी केला. 

अघई गावचे रहिवासी शैलेश निमसे यांना गुरुवारी रात्री उशिरा एक व्यक्ती घरी बोलवायला आली होती. निमसे घराला बाहेरून कडी लावून कार घेऊन गेले ते परत आलेच नसल्याची माहिती त्यांची पत्नी वैशाली यांनी दिली. शुक्रवारी सकाळी देवचोळा परिसरात एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला. गणेशपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे व अंबाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णत काटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो मृतदेह शैलेश निमसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मग शैलेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. मात्र, कुटुंबियांच्या मागणीनुसार शैलेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईत जे. जे. रुग्णालयात रवाना करण्यात आला. ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये या भयंकर घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी भिवंडी येथील रुग्णालयात धाव घेत या निर्घृण हत्येचा निषेध केला. शैलेश निमसे हे सामाजिक कार्यात आवड असलेले शिवसैनिक होते. त्यांनी अघई येथील जंगली महाराज ट्रस्टच्या जमिनी संदर्भात माहिती अधिकारातून असंख्य धक्कादायक बाबी उघडकीस आणल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या हत्येत जंगली महाराज ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांचा हात असल्याचा संशय पत्नी वैशाली निमसे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख निमसे यांचा खून पूर्वनियोजितपणे कट रचून केल्याचा आरोप ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील व पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपाती तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.