होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुत्रे पाळण्याच्या वादातून विरारच्या श्वानप्रेमी तरुणाची आत्महत्या

कुत्रे पाळण्याच्या वादातून विरारच्या श्वानप्रेमी तरुणाची आत्महत्या

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:35AMविरार : वार्ताहर

वसईतील सरगम बिल्डींगमध्ये राहणार्‍या 29 वर्षीय श्वानप्रेमी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. प्रणीत लांजेकर असे त्याचे नाव आहे. विरारमध्ये राहणार्‍या प्रणीतला कुत्रे पाळण्याची आवड होती. त्याच्याकडे तीन पाळीव कुत्रे होते. तो राहत असलेल्या  सोसायटीतील सदस्यांनी कुत्रे पाळण्यावर हरकत घेतल्याने  तसेच आपल्या आई, वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर तो विरार येथील वडिलोपार्जित घर विकून वसईतील सरगम बिल्डिंगमध्ये राहायला गेला. सोमवारी त्याच्या बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्यावर शेजार्‍यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्वच्छता प्रिय प्रणीतचा मृत्यू  झाल्याचे दोन-तीन दिवसांनी उघडकीस आल्याने त्याचे नातेवाईक मित्रमंडळींमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तेव्हा त्याचे तीन कुत्रे मृतदेहाजवळच बसून होते. 

दोन दिवसांपासून त्यांच्याही पोटात अन्न-पाणी नव्हते. प्रणीतने आत्महत्येपूर्वी आपली काकी शैला, भाऊ नंदन आणि जॉनी यांचा मोबाईल नंबर एका कागदावर लिहून ठेवला होता. पोलिसांनी त्या तिघांनाही फोन केला असता, काकी शैला आणि भाऊ नंदनने घटनास्थळी धाव घेतली, तर जॉनीने आपण बाहेर असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रणीतच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला, तर कुत्र्यांची रवानगी एका सामाजिक संस्थेत केली.