Tue, Jul 23, 2019 04:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्वेल ऑफ नवी मुंबईत अश्लील चाळे

ज्वेल ऑफ नवी मुंबईत अश्लील चाळे

Published On: Dec 26 2017 10:05AM | Last Updated: Dec 26 2017 10:05AM

बुकमार्क करा

बेलापूर: वार्ताहर

महानगरपालिकेने नेरुळ पामबीच मार्गालगत उभारलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटनस्थळाजवळ नागरिकांसाठी अनेक सुविधा उभारल्या आहे. मात्र येथे सुरक्षा यंत्रनेअभावी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी अश्‍लिल चाळे तसेच काही तरुण अवैध कामे करीत असल्याने येथे फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून सुरक्षा व्यवस्था कडक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये जॉगिंग ट्रॅक असल्याने या ठिकाणी अनेक नागरिक पहाटे 5 ते 10 व सायंकाळी 6 ते 9 या वेळेत व्यायाम करण्यासाठी येतात. या व्यतिरिक्त इतर वेळेत तरुण-तरुणी येथे हजेरी लावतात. येथील नागरिक आणि माजी सैनिक सुरेश काकडे शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास या ठिकाणी गेले असता त्यांना या ठिकाणी 50 हून अधिक तरुण जोडपे आपल्या दफ्तरासह विविध ठिकाणी बसल्याचे आढळून आले. त्यातील अनेक जण हे खुलेआम अश्‍लील चाळे करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराकडे कुणाचाही वचक नसल्याचे या तरुणांची हिम्मत चांगलीच वाढली आहे. ही मुले आपल्या पालकांची फसवणूक करीत असल्याने यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

यापूर्वी सुशोभित एल.ई.डी.फिटींगच्या 225 वीज पोलपैकी 35 वीज पोलची मध्यरात्री काही अज्ञात इसमांनी मोडतोड केल्याचा प्रकार घडला. तर एका इसमाचा मृतदेहही या ठिकाणी आढळला होता. त्यामुळे या ठिकाणी असणारी सुरक्षा व्यवस्था राम भरोसे असल्याच बोलल्या जात आहे. या ठिकाणी पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याने दुपारी 11 ते 5 या वेळेत आणि रात्री 9 नंतर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.  

ज्वेल ऑफ नवी मुंबई हे एक जॉगिंग ट्रक असून या ठिकाणी विचित्र प्रकार सुरु असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी कोण येते व कोण जाते याची कोणालाही कल्पना नसल्याने याचे वाईट पडसाद भविष्यात उमटू शकतात.त्यामुळे या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकांची नोंद होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलीस गस्त आणि सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारायला हवी. - सुरेश काकडे (माजी सैनिक), उपाध्यक्ष, मानव सेवा संस्था