Tue, Jul 16, 2019 02:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटायला हवी: सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटायला हवी: सुप्रिया सुळे

Published On: Jan 29 2018 12:24PM | Last Updated: Jan 29 2018 12:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

संपादित जमिनीसाठी योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरून धुळे जिल्‍ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारा मुंबईतील जे.जे. रुग्‍णालयात ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्‍यांच्या निधनाने सरकारवरून सर्वच स्तरातून टीका होत आहे. तर, विरोधकांनाही पाटील यांच्या निधनाचे कोलीत आयतेच मिळाल्‍याने त्‍यांनी ट्वीटवरून सरकारला झोडपून काढले आहे. 

धर्मा पाटील यांनी २२ तारखेला रात्री उशिरा मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते. त्यांच्यावर जे.जे. रुग्‍णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांचे डायलिसीसही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. 

‘‘जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली! या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे.’’ अशा शब्‍दात राष्‍ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. 

‘‘धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी... त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली...हा सरकारी अनास्थेचा बळी आहे... या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्‍यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक...’’ अशी टीका  विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. 

‘‘धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा.’’ अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

‘‘८४ वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यूने अत्यंत दु:ख झाले आहे. धर्मा पाटील यांनी असंवेदनशील आणि  उदासिन सरकारविरोधात लढा दिला. कर्जमाफीची धूळफेक, शेतमालाला भाव नाही, जमिनी संपादनाची क्रूर प्रक्रिया आणि तुटपुंजी भरपाई या सर्वाने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. या संपूर्ण प्रकरणाची न्यायलयीन चौकशी व्हावी.’’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 

‘‘दोनच दिवसांपूर्वी धर्मा पाटील यांच्या तब्येतची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे निधन धक्कादायक आहे. हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबतआहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’’ असे ट्वीट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.