Wed, May 22, 2019 21:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फडणवीसांनी मोडला विलासरावांचा रेकॉर्ड

फडणवीसांनी मोडला विलासरावांचा रेकॉर्ड

Published On: Dec 06 2018 9:19PM | Last Updated: Dec 06 2018 9:19PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सलगपणे भूषविण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा विक्रम मोडला आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक दिवस सलग मुख्यमंत्रिपदावर राहणारे फडणवीस हे दुसरेच मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आता राज्याच्या कारभारावर आपली पक्‍की मांड बसविली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदी 1 हजार 498 दिवसांचा कालावधी पूर्ण करून करून त्यांनी विलासराव देशमुख यांना मागे टाकले.

विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाच्या दुसर्‍या टर्ममध्ये 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या काळात सलग 1 हजार 494 दिवस मुख्यमंत्रिपद भूषविले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तीन डिसेंबरला हा विक्रम मोडला. विलासरावांना पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून 1 हजार 187 दिवस काम करता आले होते.

अशोक चव्हाण यांना पाहिल्यावेळी 311 दिवस, तर 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 या दरम्यानच्या दुसर्‍या टर्ममध्ये 368 दिवसच काम करता आले. त्यानंतर आदर्श घोटाळ्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला.

वसंतराव नाईक सर्वाधिक काळ म्हणजे सलग 11 वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिले. 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967, 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972 आणि 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975 असे 4 हजार 97 दिवस नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भूषविले.