फडणवीसांचा राजीनामा, तरीही म्हणाले नवीन सरकार भाजपच्या नेतृत्वाखालीच

Last Updated: Nov 08 2019 5:34PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क 

राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. यामुळे राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीतच देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर सह्याद्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण राजीनामा दिल्याचे जाहीर केले. आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून तो राज्यपालांनी स्वीकारला, असे फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी ज्यावेळी शिवसेनेने निकालानंतर आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. या वक्तव्याने धक्का बसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीलच नवीन सरकार स्थापन केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. 

निवडणूक प्रचारात आपणच पुढचा मुख्यमंत्री होणार असा ठाम विश्वास व्यक्त करण्याऱ्या मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर पदाचा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत. घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा माझ्यासमोर झाली नव्हती. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असेल तर मला माहित नाही. पण, ज्या प्रकारे त्यांनी निकालानंतर वक्तव्य केली ती योग्य नव्हती. तसेच उद्धव ठाकरेंबरोबर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला होता पण, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. याउलट त्यांनी राष्ट्रवादीशी चर्चा करणे त्यांना भेटणे हे योग्य नव्हते. 

शिवसेनेने राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतातना नरेंद्र मोदींवर विरोधकांपेक्षाही जहरी टीका केली. पण, भाजपच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. याबाबात आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी हे बंद होईल असे सांगितले पण, ते काही बंद झाले नाही. त्यामुळे अशा पक्षाबरोबर का जावे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात आम्ही शेतकऱ्यांसाठी भरीव काम करण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. तसेच पायाभूत सुविधा देण्यासाठीही मोठी कामे हातात घेतली. यामुळेच लोकसभेला युतीने भरभरुन मतदान केले. तसेच विधानसभेलाही लोकांनी युतीला पूर्ण बहुमत मिळाले. पण, या जनादेशाचा अनादर झाला असल्याची भावना बोलून दाखवली. तसेच त्यांनी राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीलच नवीन सरकार स्थापन केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी कोणतीही फोडाफोडी न करता भाजप मजबूत सरकार देऊ असे सांगितले. ज्यांनी भाजप फोडाफोडी करत आहे असा आरोप केला. त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं असे आव्हानही दिले.