Tue, Jul 07, 2020 05:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'आधुनिक भारताचे शिल्पकार हे पंडित जवाहरलाल नेहरुच'

'आधुनिक भारताचे शिल्पकार हे पंडित जवाहरलाल नेहरुच'

Last Updated: May 27 2020 12:02PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडित नेहरुंचे अमूल्य योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या कुटुंबाने केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान देशवासीयांच्या चिरंतन स्मरणात राहणारे आहे. पंडितजींनी उभारलेल्या शैक्षणिक, संशोधन संस्था, पायाभूत प्रकल्पांचा रचलेला पाया, युवकांच्या नेतृत्व विकासाला दिलेली दिशा, लोकशाही रुजवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न हे सारे अलौकिक आहे. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचे स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, असे पवार यांनी म्हटले.

वाचा - मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा मिळणार वर्षभराची मुदतवाढ

माता रमाईंनाही अभिवादन

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांची सावली, वंचित बांधवांची माऊली माता रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, असे पवार यांनी म्हटले. माता रमाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई, त्यागाची मूर्ती, माता रमाईंनी प्रचंड कष्ट, गरिबीचे चटके सहन करत डॉ. बाबासाहेबांना समर्थ साथ दिली. डॉ. बाबासाहेबांच्या महामानवापर्यंतच्या प्रवासातील त्या प्रमुख साथीदार बनल्या. माता रमाई नसत्या तर कदाचित डॉ. बाबासाहेब घडले नसते. डॉ. बाबासाहेबांना महामानव पदापर्यंत घेऊन जाणार्‍या आमच्या माता रमाईंना त्रिवार वंदन, अशा शब्दात पवार यांनी श्रध्दांजली वाहिली.