Thu, Jul 18, 2019 21:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नास नकार देणार्‍या प्रियकराची विवाहितेकडून हत्या

लग्नास नकार देणार्‍या प्रियकराची विवाहितेकडून हत्या

Published On: Mar 22 2018 1:43AM | Last Updated: Mar 22 2018 1:16AMठाणे : खास प्रतिनिधी

नोकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या विवाहितेने आपल्या सुखी संसाराला लाथ मारली आणि कर्नाटकाहून थेट ठाण्यातील प्रियेकराचे घर गाठले. काही तासानंतर सध्या तुझ्याशी लग्न करता येणार नाही, हे प्रियकराचे शब्द ऐकून संतापलेल्या विवाहितेने त्याची झोपेत असताना निर्घृण हत्या करून विमानाने कर्नाटक गाठले. या खुनाचा उलघडा अवघ्या 24 तासात लावून कासारवडवली पोलिसांनी आरोपी रूमा बेगम अन्वर हुसैन लष्कर (28) हिला जेरबंद केले.

घोडबंदर रोडवरील साईनगरामधील हनुमानगल्लीत 19 मार्चरोजी एका खोलीमध्ये 25 वर्षीय  कबीर अहमद लष्कर मूळ गांव आसाम याचा तरूणाचा मृतदेह आढळला. त्याचा गळा आवळून, डोक्यावर विटेने प्रहार करून त्याचे गुप्तांगावर वार करून हत्या करण्यात आली होती.  खुनाच्या घटनेपूर्वी त्या घरात एक महिला राहत असल्याची माहिती उघड झाली. 16 मार्चरोजी एक महिला मृताच्या घरी आली आणि 18 मार्चरोजी विमानाने पुणेमार्गे बंगलोरला गेल्याचे तपासात समोर आले. ठाणे पोलिसांच्या एका पथकाने कर्नाटकमधील अनीकल जिल्ह्यातील जिगनी गावात जाऊन  रुमा बेगम अन्वर हुसैन लष्कर (28) हिला ताब्यात घेतले. आरोपीने खुनाची कबुली देत तो आपला प्रियकर असल्याचे सांगितले. मृत कबीर हा पूर्वी आरोपी रूमा यांच्या गावातील मदिना सायकल स्टोअर्समध्ये कामाला होता. त्यावेळी दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि कबीरने लग्नाची मागणी घातली. विवाहित असल्याने सुरूवातीला तिने लग्नास नकार दिला.  त्याने पुन्हा मागणी घालत मी तुझ्याशी लग्न करेन, तू घर सोडून ठाण्यात ये असा आग्रह धरला. आपल्या पेक्षा तीन वर्षाने लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात आंधळी झालेल्या रूमाने अखेर आपल्या सुखी संसाराला लाथ मारली आणि 16 मार्चला ठाण्यात निघून आली. 24 तास एकत्र राहिल्यानंतर कबीरने सध्या तुझ्याशी लग्न करता येणार नाही, असे स्पष्ट केल्याने तिचा संताप अनावर झाला. आपला विश्‍वासघात झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने  त्याचा काटा काढला.