Tue, May 21, 2019 00:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी

शरद पवारांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोनवेळा मतदान करण्याचे वक्‍तव्य करणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर शुक्रवारी दोन वर्षांनंतर उच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर ही सुनावणी होईल.

शरद पवार यांनी, माथाडी कामगारांच्या मेळाव्यात  निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत, त्यामुळे आधी गावाला जाऊन मतदान करा आणि नंतर नोकरी असलेल्या गावात असे दोनदा मतदान करा, असे वक्‍तव्य केले होते. यासंदर्भात भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सुरुवातीला जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावेळी न्यायालयाने या मुद्दा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, निवडणूक आयोगानेही या तक्रारीची दखल न घेतल्याने पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी याचिकेत केली आहे.