Wed, Jul 17, 2019 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शारदाश्रम’ होणार इतिहासजमा

‘शारदाश्रम’ होणार इतिहासजमा

Published On: Apr 25 2018 2:24AM | Last Updated: Apr 25 2018 2:24AMमुंबई : प्रतिनिधी 

मास्टर-बास्ट सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांच्यासारख्या क्रिकेटवीरांना घडवणार्‍या दादर भवानी शंकर रोड येथील शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेचे नाव बदलण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल असे नामकरण होणार असल्यामुळे शारदाश्रम हे नाव इतिहासजमा होणार आहे. या नामकरणाला दादरकरांनी मात्र विरोध केला आहे. 

दादर पश्‍चिमेला शारदाश्रम विद्यामंदिर शाळा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांनी क्रिकेटचे धडेही याच शाळेत गिरवले. तेंडुलकर याच्यासारखे अनेक क्रिकेटवीर या शाळेने घडवले आहेत. या शाळेला नोव्हेंबर 1969 मध्ये विनाअनुदानित शाळा म्हणून मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. त्यानंतर पहिली ते चौथी 12 तुकड्यांना कायम अनुदानित तत्त्वावर 1 जून 2015 ते 31 मे 2020 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. या शाळेच्या व्यवस्थापनाने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये शाळेच्या  सभेत नावात बदल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या नावाच्या बदलाला 11 जुलै  2017 मध्ये शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.  त्यामुळे शारदाश्रम विद्यामंदिर या प्राथमिक शालेचे नाव एसव्हीएम इंटरनॅशनक स्कूल असे करण्यात येणार आहे. शाळेच्या नावात बदल करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षण समितीत प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाला समितीने मंजूरी दिल्यानंतर शारदाश्रमचे नामकरण करणे शक्य होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान दादर सारख्या मराठी लोकवस्तीत शारदाश्रम विद्यामंदिर म्हणून परिचित असणारी या शालेचे नामकरण करण्यात येत असल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शारदाश्रम ही दादरची ओळख होती. त्यामुळे व्यवस्थापनाने शालेचे नामकरण करू नये, असे मत दादरच्या नरेश धुरू यांनी व्यक्त केले. इंग्रजी शाळा मराठी नावानेही चालवता येऊ शकतात. यासाठी नामकरण करण्याची आवश्यकता नसल्याचे मत तुषार राऊळ यांनी व्यक्त केले. त्यामुले नामकरणावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बर्वेनगर मराठी शाळा अखेर बंद

मुंबई : प्रतिनिधी 

विद्यार्थी पटसंख्या शून्यावर आल्यामुळे पालिकेने घाटकोपर बर्वे नगर शाळा क्रमांक 3 बंद केली आहे. या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भटवाडी बर्वेनगर मराठी शाळा क्रमांक 4 मध्ये बदली करण्यात आली आहे. पण या शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी या चार वर्गाची विद्यार्थी पटसंख्याही अवघी 96 इतकी आहे. त्यामुळे ही पटसंख्या येणार्‍या काळात खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पालिकेच्या मराठी माध्यमासह गुजराती व हिन्दी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत. गेल्या पाच वर्षात 50 हून जास्त मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर काही शाळांचे अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. भटवाडी येथे असलेली बर्वेनगर मनपा शाळा क्रमांक 3 मध्ये दशकापूर्वी 300 हून जास्त विद्यार्थी होते. पण त्यानंतर घसरण होत सप्टेंबर 2017 मध्ये या शाळेतील विद्यार्थीसंख्या शून्यावर आली. त्यामुळे या शाळेचे बर्वेनगर शाळा क्रमांक 4 मध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शाळेत या शाळेचे विलीनीकरण होणार आहे त्या शाळेतील विद्यार्थीसंख्या  अवघी 96 असून सरासरी हजेरी 87 इतकी असते.

या शाळेतील विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. एकेकाळी 300 ते 400 विद्यार्ती पट असणार्‍या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या 100 च्या आत विद्यार्त्यांची संख्या आहे. त्यामुले अशा शाळा चालवणे पालिकेला खर्चिक ठरत आहेत. त्यामुळे शाळेचे विलिनीकरण करून खर्च वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंद होणार्‍या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना अन्य शाळेत समाविष्ठ करण्यात येत असल्यामुले त्यांचे कोणतेही नुकसान होत नसल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

Tags : mumbai, Shardashram, school,  change the name, decision,