होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला

मनसेच्या सहा नगरसेवकांचा फैसला ६ जानेवारीला

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:35AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा फुटीर नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नवीन वर्षात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 6 जानेवारीला या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर कोकण आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मनसे नगरसेवकांच्या अधिकृत शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. त्यामुळे पालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ 91 होणार आहे. 

मनसेचे गटनेते दिलीप (मामा) लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पण हा प्रवेश बेकायदेशीर असल्याचे सांगत मनसेने कोकण आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली. विशेष म्हणजे याला भाजपाने पाठिंबा दिल्यामुळे मनसे नगरसेवकांचा शिवसेनेतील अधिकृत प्रवेश लांबला. मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी फासे टाकले होते. या फाश्यात मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक अडकले. 

या नगरसेवकांचा स्वतंत्र गट न करता, त्यांना शिवसेना गटातच सामील करून घेण्यात आले. तसे पत्र शिवसेनेच्या वतीने कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले. पण यावर तब्बल तीन महिने लोटले तरी, निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केलेले ते सहा नगरसेवक आजही तांत्रिकदृष्ट्या मनसेचे आहेत. 

दरम्यानच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या महापालिका गटनेतेपदी संजय तुर्डे यांची नियुक्ती केली. पण शिवसेनेने मनसे गटनेतेपदाचा निर्णय महापालिका सभागृहात रोखून धरला. त्यामुळे गटनेता नेमून त्या सहा नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेचा डाव फसला.