Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:32AMमुंबई : प्रतिनिधी 

पावसाळ्यात रस्त्यावरील मॅनहोल उघडू नये याबाबत मुंबई महापालिका सतर्क असते पण, चोरट्यांनी कुर्ला येथील प्रगती सोसायटीजवळील मॅनहोलवरील झाकण चोरल्याने त्या गटारात पडून शुक्रवारी दिनेश प्रकाश जाटोलिया (24)  या तरुणाचा मृत्यू ओढवला. शुक्रवारी रात्री 10.15 च्या सुमारास तोल गेल्याने दिनेश हा मॅनहोलमध्ये कोसळला. ही गोष्ट लक्षात येताच स्थानिकांनी पोलीस, अग्निशमन दलास त्याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यास वाचवण्यात यश आले नाही.

कुर्ला पूर्व भागातील प्रगती सोसायटीसमोरील नाल्यात शुक्रवारी रात्री मॅनहोलमध्ये एक तरुण पडल्याचा संदेश पोलीस, अग्निशमन दलास आला. तेव्हाच इथल्या मॅनहोलचे झाकण चोरीला गेल्याने दिनेश त्यात कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशमन दलाच्या पथकांनी जाटोलिया यास बाहेर काढले. त्यास तातडीने सायन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. पण तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याप्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

गतवर्षी पावसाळ्यात लोअर परळ येथील दीपक सिनेमागृहाजवळील मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये मुलुंड येथील नीलिमा पुराणिक ही महिला मॅनहोलमध्ये पडून जखमी झाली. त्यानंतर पालिकेने आतापर्यंत 1450 मॅनहोलवर जाळ्या बसवल्याचा दावा केला आहे. पण, कुर्ला येथे झालेल्या या घटनेत झाकण चोरीला गेल्याने दिनेशला प्राण गमवावे लागले.