Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवीच्या एक्‍झिटने राजकीय क्षेत्रातही हळहळ

श्रीदेवीच्या एक्‍झिटने राजकीय क्षेत्रातही हळहळ

Published On: Feb 25 2018 10:09AM | Last Updated: Feb 25 2018 8:56AMमंबई : पुढारी ऑनलाईन

आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलीवूडसह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजाताच सोशल मीडियावरही कलाकार, खेळाडू, राजकीय वर्तुळातून शोक व्यक्‍त करण्यात येत आहे. 

देशातील अनेक राजकीय नेत्‍यांनी या गुणी अभिनेत्रीला सोशल मीडियावरून आदरांजली वाहिली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, अभिनेता कमल हसन, यूथ काँग्रेस, आंध्र प्रदेशचे राज्यमंत्री नारा लोकेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्‍यक्‍त केला आहे. 

अभिनेता आणि मक्‍कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी श्रीदेवीच्या निधनाबद्दल भावूक उद्‌गार काढले आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे जुन्‍या आठवणींचा काळ माझ्या मनात उभा राहिला असल्योचे त्यांनी म्‍हटले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीदेवीच्या निधनाबद्दल दु:ख व्‍यक्‍त करून त्यांचे कार्य इतर कलाकारांसाठी प्रेरणा देणारे राहिल अशी भावना व्‍यक्‍त केली आहे. 

प्रतिभावान आणि बहुआयामी व्‍यक्‍तिमत्‍व हरपल्याने धक्‍का बसल्याचे ट्विट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्‍ता शाहनवाज हुसेन यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल शोक व्‍यक्‍त केला असून, त्यांचे भारतीय चित्रपटसृष्टीला मोठे योगदान असल्याचे ट्विट केले आहे.

तेलगू व भारतीय सिनेजगात श्रीदेवी यांचे नाव कायम स्‍मरणात राहिल अशी भावना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ट्‌विटवर व्‍यक्‍त केली आहे. 

श्रीदेवी यांच्या हिंदी, तेलगू चित्रपटातील अनेक भूमिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहतील अशी भावना छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी ट्विटवरून व्‍यक्‍त केली आहे. 

आंध्र प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नारा लोकेश यांनी श्रीदेवी यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्‍ही सहभागी असल्याचे सांगत त्यांनी शोक व्‍यक्‍त केला आहे. 

यूथ काँग्रेसकडूनही दु:ख व्‍यक्‍त केले आहे. तर महाराष्ट्राच्या महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रीदेवी यांच्या निधनामुळे आपल्याला धक्‍का बसल्याचे ट्‌विट केले आहे.

दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या खास शैलीतील अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावना महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्‌विटव्‍दारे व्‍यक्‍त केली आहे. 

महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधकृष्‍ण विखे-पाटील यांनी म्‍हटले आहे की, श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्या अभिनयक्षेत्रातील ‘चांदणी’ नव्हे तर एक दैदिप्यमान ताराच होत्या. असंख्य भूमिका त्यांनी जीवंत अभिनयाने अविस्मरणीय केल्या. चाहत्यांसाठी त्या कायम अमर राहतील. अशा शब्दात त्‍यांनी आदरांजली वाहली आहे.