Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बँकॉकमध्ये होणार्‍या आशियाई स्पर्धेसाठी निवड

बँकॉकमध्ये होणार्‍या आशियाई स्पर्धेसाठी निवड

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 13 2018 12:59AM

बुकमार्क करा
डेांबिवली : वार्ताहर

12 व्या राष्ट्रीय स्पोर्ट अ‍ॅरोबिक आणि फिटनेस स्पर्धेत डोंबिवलीच्या 9 खेळाडूंनी महाराष्ट्र संघातून खेळून 2 सुवर्ण 13 रौप्य आणि 1 कांस्य अशी 16 पदके पटकावून जनरल चॅम्पियनशीपचा पहिल्या क्रमांकाचा चषक पटकावला. त्यांच्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या खेळाडूंची मे 2018 मध्ये बँकॉक येथे होणार्‍या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 5 ते 7 जानेवारी या कालावधीत गाझीयाबाद उत्तरप्रदेश येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी देशभरातल्या 15 राज्यांतील 489 खेळाडू सहभागी झाले होते. डोंबिवलीतील रोबिका-दी स्पोर्ट्स असोसिएशनच्या 9 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. केडीएमसी क्षेत्र जिल्हा स्पोर्टस् रोबिक आणि फिटनेस असोसिएशन या जिल्ह्यातर्फे राज्याच्या संघातून खेळले. 

स्वराली रावले 1 सुवर्ण व 1 रौप्य, ईश्वरी शिरोडकर 1 सुवर्ण व 1 रौप्य, जाई मानकामे 3 रौप्य, सार्थक रावले 3 रौप्य, अमेय शिंदे 2 रौप्य, स्तवना कुलकर्णी 1 रौप्य, अद्वैत पवार 1 रौप्य, श्रेयस पाटील 1 रौप्य आणि राधा चव्हाण 1 कांस्य अशा 9 खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. संघाच्या घवघवीत यशासाठी संस्थेचे अध्यक्ष माधव मानकामे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून, तर संगिता संदिप रावले, प्रमोद पवार व गौरी सचिन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती रोबिका-दी स्पोर्टस् असोसिएशनच्या राजश्री आयरे यांनी दिली.