Sat, Feb 23, 2019 10:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिपब्लिकन ‘पक्षांची’ नोंदणी धोक्यात

रिपब्लिकन ‘पक्षांची’ नोंदणी धोक्यात

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:42AMमुंबई : चंदन शिरवाळे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन’नाव धारण केलेले बहुतांश राजकीय पक्ष निवडणुका लढवित नाहीत. प्रस्थापित पक्षांसोबत आघाडी करून या पक्षांचे नेते स्वार्थ साधत असल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्यामुळे रिपब्लिकन शब्द असलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे. आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनीही याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.

डॉ. आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया हा पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संकल्पना मांडली होती. दुर्दैवाने, त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे राज्यातील काही नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली. डॉ. आंबेडकरांमुळे रिपब्लिकन शब्दाला वलय निर्माण झाल्यामुळे या नावाने राज्यात सध्या अनेक गट कार्यरत आहेत. 

मात्र, आठवले, गवई,आंबेडकर हे गट वगळता बहुतांश रिपब्लिकन गट निवडणुकांच्या मैदानात उतरत नाहीत. प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत आघाड्या करून या पक्षाचे नेते आपला स्वार्थ साधत आहेत. लोकशाही आणि निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची त्यांच्याकडून प्रतारणा होत असल्याची तक्रार आंबेडकरी अनुयायी डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. 1956 मध्ये नोंदणीकृत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वगळता पक्षाच्या नावामध्ये रिपब्लिकन शब्द असलेल्या सर्व पक्षांची नोंदणी रद्द करावी, किंवा संबधितांना रिपब्लिकन शब्द वगळण्याचे आदेश द्यावेत, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गटांची मान्यता रद्द न केल्यास 8 ऑगस्ट या क्रांतिदिनी कफपरेड येथील आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपोषण तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा डॉ. डोंगरगावकर यांनी दिला आहे.