Thu, Jul 18, 2019 10:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डाळी होणार स्वस्त; आयातीवर घातले निर्बंध

डाळी होणार स्वस्त; आयातीवर घातले निर्बंध

Published On: Sep 07 2018 1:21AM | Last Updated: Sep 07 2018 1:21AMमुंबई : चंदन शिरवाळे

तुरीसह अन्य डाळींच्या किमती गगनाला भिडल्यामुळे गेल्या वर्षांपूर्वी सर्वसामान्यांच्या ताटांमधून गायब झालेल्या डाळी आता पोटभरुन खाण्याची संधी आली आहे. यंदा डाळींच्या उत्पादनामध्ये देशाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत अव्वल क्रमांक पटकावल्यामुळे सर्व प्रकारच्या डाळी आता स्वस्त होणार आहेत.

देशात दरवर्षी विविध डाळींची सुमारे 240 ते 250 लाख टन इतकी मागणी असते. पण उत्पादन केवळ 140 लाख टन ते 180 लाख टन होते. देशाची डाळींची गरज भागविण्यासाठी आयात करावी लागते. तरीसुध्दा गेल्या वर्षी डाळीचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे भाजप सरकारच्या तोंडचे पाणी पळाले होते. डाळींच्या किमती अचानक वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे, याबाबत शेतकरी नेते तसेच कृषी शास्त्रज्ञांसोबत बैठक घेतली होती. 

 या बैठकीत त्यांनी जादा उत्पन्न मिळणार्‍या डाळीच्या वाणाची निर्मीती करण्याचेआवाहन केले होते.यंदा डाळीचे उत्पादन वाढले आहे. बंपर उत्पादनामुळे सरकारने डाळ आयातीवर निर्बंध घातले आहेत. 2017- 18 मध्ये विविध देशांतून केवळ 56 लाख टन डाळ आयात करण्यात आली. यावर्षी केवळ 12 लाख टन आयात करण्यात आली. आता सरकारच शेतकरी आणि व्यापार्‍यांना डाळ निर्यातीसाठी प्रोत्साहन देत आहे, अशी माहिती भारतीय डाळ आणि धान्य असोसिएशनचे उपाध्यक्ष विमल कोठारी यांनी दिली.

हरभरा डाळीच्या उत्पादनात भारत अन्य देशांच्या तुलनेत खूप पुढे गेला आहे. देशातील डाळींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि किंमती स्थिर ठेवण्यासाठी हरभर्‍याच्या डाळीवर 66 टक्केआयात शुल्क तर मसूर डाळीवर 33 टक्के आयात शुल्क लावले आहे.