Fri, Jul 19, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगाव परिसरात संचारबंदी जारी

भीमा कोरेगाव परिसरात संचारबंदी जारी

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 12:44AM

बुकमार्क करा
सणसवाडी : वार्ताहर

भीमा कोरेगाव, सणसवाडी, पेरणे फाटा येथे संचारबंदी जारी करण्यात आली आहे. मंगळवारी भीमा कोरेगाव, शिरूर आणि कोंढापुरी येथे नागरिकांनी रास्ता रोको केला.  एक टपरी जाळण्यात आली. किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता अनुचित प्रकार घडला नाही. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शांततेचे आवाहन केले. दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेच्या निषेधार्थ बुधवार दि. 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

सणसवाडी येथे केसरकर व विश्वास नांगरे पाटील यांनी भेट दिली. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. दंगलीत मृत्यू पडलेल्या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सणसवाडी येथे दंगलीत राहुल बाबाजी फटांगडे (वय 30, रा. सणसवाडी) याचा मृत्यू झाला. राहुल याच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी कान्हूर मसाई (ता. शिरूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमा कोरेगाव येथे चार व्यवसाय, 16 चारचाकी वाहने, दुधाचे टेम्पो यांचे दहा ते बारा कोटींचे नुकसान झाले. सणसवाडीत बारा दुकानांची तोडफोड, जाळपोळ झाली. दोन ट्रकसह वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाली. त्यात चार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी भीमा कोरेगाव, सणसवाड बंद होते. दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद होते.

दंगेखोरांना शासन होणारच : केसरकर

दंगलखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध लोकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. राज्यात शांतता नांदावी आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटू नये, यासाठी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले. त्यांनी विजयस्तंभ व वढू बुद्रुक गावाला भेट दिली. त्यांच्यासमवेत राज्याचे कायदा व सुव्यवस्था महासंचालक बिपिन बिहारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोलिस अधीक्षक सुवेझ हक उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, लाखोंचा जमाव हाताळणे अवघड असते. या दंगलीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबाला शासनाकडून पूर्ण आर्थिक मदत करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण लक्ष या घटनेवर आहे. यामध्ये जखमी झालेल्यांनाही शासन मदत देईल. अनेक गरिबांना याचा फटका बसला आहे. विशेष बाब म्हणून विमा नसतानाही पोलिस व महसूल खात्याकडून पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल.