Sun, Feb 17, 2019 04:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपघातग्रस्त मुलाभोवती बघ्यांची गर्दी!

अपघातग्रस्त मुलाभोवती बघ्यांची गर्दी!

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:59AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण पूर्वेकडील गुरुधाम हॉटेलजवळ शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एका 15 वर्षाच्या मुलाला अपघात झाला. यानंतर त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. मात्र, कोंडाळ्यातील एकानेही रस्त्यात विव्हळत पडलेल्या लहानग्या मुलाला उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे सौजन्य दाखवले नाही. कल्याणच्या एका महिलेने मात्र गंभीर दुखापत झालेल्या मुलाला मदतीचा हात तर दिलाच. पण मदत करण्याऐवजी गर्दी करून त्या मुलाला अधिक त्रास देणार्‍या मुर्दाड बघ्यांचे मात्र या महिलेने सोशल मीडियावर चांगलेच वाभाडे काढले. ओम भोसले असे या अपघातग्रस्त मुलाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख असलेल्या आशा रसाळ या स्कुटरवरून कल्याण पूर्वेला असलेल्या हॉटेल गुरूधाम येथून जात होत्या. त्याचवेळी 15-16 वर्षाच्या मुलाला एका वाहनाने धडक दिली होती. या अपघातानंतर त्या मुलाला नागरिकांनी एका दुकानाच्या पायर्‍यांवर झोपवले. त्याच्या चारही बाजुला गर्दी जमली होती. मात्र, त्यातील एकानेही किमान 108 नंबरच्या अ‍ॅम्ब्युलन्सला संपर्क साधला नाही. रसाळ यांनी याठिकाणी धाव घेत त्याच्या दुखापतीचा आढावा घेतला. या अपघातात मुलाच्या मांडीला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

रसाळ यांनी आजुबाजूच्या दुकानदारांकडेही मदत मागितली. मात्र, एकानेही मदतीस होकार दिला नाही. शिवाय त्यातील एकाने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रुग्णालय असल्याचे उद‍्धटपणे सांगितले. त्यांनी एका नागरिकाला बोलवून स्ट्रेचर घेऊन येण्यास सांगितले. तो रुग्णालयात गेला असता त्याला स्ट्रेचर देण्यास नकार दिला. त्यामुळे रसाळ यांनी रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरसह उपस्थित सगळ्यांना धारेवर धरले आणि स्वतः स्ट्रेचर घेऊन मुलाला रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, सदर मुलाच्या पालकांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या मुलाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या मांडीचे हाड फ्रॅक्‍चर झाले आहे. मात्र, रसाळ यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने या मुलाला वेळीच उपचार मिळाले. गर्दी पाहून आलेल्या रसाळ यांनी जखमी मुलाला प्रसंगावधान पाहून केलेली मदत नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.