Mon, Sep 24, 2018 01:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत पेंग्विनचे अंडे पाहण्यासाठी गर्दी

मुंबईत पेंग्विनचे अंडे पाहण्यासाठी गर्दी

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 22 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये असलेल्या एका पेंग्विन पक्ष्याने अंडे घातले असून ते पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. हंबोल्ट जातीच्या पेंग्विननं हे अंडे 5 जुलै रोजी घातले असून साधारणतः चाळीस दिवसांनी त्यातून पिल्लू बाहेर येईल.

मादी फ्लीपर व नर मिस्टर मोल्ट ते आळीपाळीने  उबवीत आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं ते अंड्याची कमालीची काळजी घेत आहेत. विशेष म्हणजे पेंग्विन पक्ष्यांची काळजी घेणार्‍या, देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यालाही अंडे असलेल्या घरट्यापर्यंत ते येऊ देत नाहीत. असा प्रयत्न झालाच तर पेंग्विन त्याच्याही अंगावर धावून जातात. पर्यटकांना ही जोडी एकत्र पाहायला मिळत नाही. देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यालाही ते अंड्यापर्यंत येऊ देत नसल्याने अंड्याच्या स्थितीबाबत कर्मचारी अनभिज्ञ राहतात. मात्र, पेंग्विनना देण्यात येणार्‍या अन्नाच्यावेळी ते दोघेही बाहेर येत असल्याने त्याचवेळात या अंड्याबाबतच्या स्थितीची माहिती कर्मचार्‍यांना घेता येते.

प्राणिसंग्रहालयात सध्या सात हंबोल्ट पेंग्विन आहेत. ते पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहेत. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली आहे. 2016-17 मध्ये प्राणिसंग्रहालयाचे वार्षिक उत्पन्न जवळपास 74 लाख रुपये होते. ते 2017-18 मध्ये 4 कोटी सदतीस लाख इतके झाले आहे. त्यावरून उत्पन्न वाढीची कल्पना येते. उत्पन्न वाढीसाठी अन्य काही घटक कारणीभूत असले तरी पेंग्विन हे मुख्य उत्पन्नाचा मार्ग राहिले आहे. ऑगस्ट महिन्यापासून प्राणिसंग्रहालयात एका माणसासाठी प्रवेश फी 50 रुपये, तर चौघांच्या कुटुंबासाठी 100 रुपये इतकी आकारली जाते. पूर्वी ती ज्येष्ठांसाठी 5 रुपये तर मुलांसाठी अवघी 2 रुपये होती.