Wed, Apr 24, 2019 19:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदीही संकटात

महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदीही संकटात

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी 

आयसीएसई बोर्डाच्या भाषा विकल्पाच्या नव्या धोरणामुळे या शाळांमधून मराठी आणि हिंदीसह सर्वच प्रादेशिक भाषा हद्दपार होण्याचे संकट निर्माण झाले आहे. या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती आणि शिक्षक साहित्य संमेलन संस्थेने 21 फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन) ते 27 फेब्रुवारी (मराठी राजभाषा दिन) या सप्ताहात भाषा बचाव मोहीम सुरू केली आहे. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दादर चौपाटीवरच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात शिक्षक कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कवी संमेलनाचे संयोजक संजय गवांदे आणि संजय शिंदे यांनी दिली. 

मुंबईत आयसीएसई बोर्डाच्या अनेक शाळा असून या शाळांमध्ये मराठी, हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषा शिकण्याची संधी होती. मात्र नव्या वैकल्पिक धोरणामुळे ही संधीच हिरावून घेतली गेली आहे. राज्य बोर्डाच्या ज्युनिअर कॉलेजमधून मराठी आणि प्रदेश भाषांना यापूर्वीच कमी महत्व देण्यात आले आहे. तर राज्यातल्या माध्यमिक शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत, उर्दू , गुजराती या भाषाविषयांसाठी फक्त एकच शिक्षक देण्याचे धोरण सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्रात मायबोली मराठीसह सर्वच भाषा संकटात आल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य हिरावले जाणार आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडण्याचा मोठा धोका आहे, असा आरोप गवांदे आणि शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

ज्ञानेश्वर उद्यानात होणार्‍या कवी संमेलनाला मराठी, हिंदी, उर्दूतील अनेक मान्यवर कवी हजेरी लावणार आहेत. माझ्या भाषेसाठी, माझी कविता, या संकल्पनेवर शिक्षक कवींनी आपली कविता एका छोट्या पोस्टरवर लिहून आणून ज्ञानेश्वर उद्यानात प्रदर्शित करावी, असे आवाहन संजय गवांदे आणि संजय शिंदे यांनी केले आहे.