Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसआरए सदनिकेसाठी बोगस कागदपत्रे दिल्यास गुन्हा

एसआरए सदनिकेसाठी बोगस कागदपत्रे दिल्यास गुन्हा

Published On: Jul 20 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 1:26AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए)बोगस कागदपत्रांच्या आधारावर सदनिका हडप करण्याबाबतच्या तक्रारींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून यापुढे बोगस कागदपत्रे दाखल करणार्‍यांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. पुण्यामध्ये स्मार्टसिटीअंतर्गत औंध येथे सर्व्हे नंबर 159 मध्ये गरिबांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविला जात आहे. परंतु या योजनेमध्ये देवराम परीहार या उद्योगपतींच्या नावाचा समावेश करण्यात आला असून पात्रता यादीमध्ये त्यांना एक बिगरनिवासी दुकान मंजूर करण्यात आले आहे. पात्रता यादीत नाव समावेश करण्यासाठी त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या काही अधिकार्‍यांना हाताशी धरले होते, असा आरोप गायकवाड यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला.

राज्यमंत्री वायकर यांनी या आरोपांची दखल घेतली. बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याचे त्यांनी मान्य केले. यामुळे भविष्यात अशा प्रकारची बनवाबनवी रोखण्यासाठी यापुढे बोगस कागदपत्रे सादर करणार्‍यांविरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एसआरएची पात्र आणि अपात्र यादी जाहीर करणे संबधित नियोजित गृहनिर्माण सोसायटीला बंधनकारक आहे. मात्र, हा नियम कोणीही पाळत नाही. त्यामुळे झोपडीधारकांची फसवणूक थांबण्यासाठी प्राधिकरणामार्फत पात्रता यादी प्रकाशित केली जाईल, तसेच ही यादी आधारकार्डशी लिंक केली जाईल, असेही वायकर यांनी स्पष्ट केले.