Tue, Apr 23, 2019 21:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विभक्‍त होण्यासाठी आले... पण गेले एकत्र

विभक्‍त होण्यासाठी आले... पण गेले एकत्र

Published On: Feb 16 2018 10:51AM | Last Updated: Feb 16 2018 10:51AMठाणे : वार्ताहर

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत संसारातून विभक्त होण्याच्या मानसिकतेने आलेल्या जोडप्यांचे समुपदेशन करीत ठाणे कौटुंबिक न्यायालयात गुरुवारी 13 कुटुंबं विभक्त होण्याऐवजी एकत्र आली. ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या मध्यस्थीने 13 कुटुबांचे संसार पुन्हा फुलले आणि एकत्र नव्या संसाराच्या मार्गी लागले.

कामाच्या आणि आर्थिक अडचणीतून विविध कारणांनी वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीत भांडणे होतात, अशी भांडणे काही वेळा टोकाला जाऊन संसाराचा काडीमोड होतो. मात्र, अशा वेळी पती-पत्नीला योग्य समुपदेशन झाल्यास हे वाद संपू शकतात हे ठाणे कौटुंबिक न्यायालयात समोर आले आहे. गुरुवारी ठाणे न्यायालयात या 13 दाम्पत्यांचा अनुभवकथन सोहळा पार पडला. त्यात त्यांच्या आयुष्यात झालेला बदल यावेळी सांगण्यात आला.

विभक्‍त झाल्याने कोमेजलेल्या चेहर्‍यांवर ठाणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. रुकमे आणि विवाह समुपदेशक अिेशनी पुरंदरे यांच्या प्रयत्नाने पुन्हा हसू फुलले. संसारात होणार्‍या लहानसहान भांडणामुळे अगदी टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. त्याच वेळी विभक्त झाल्यामुळे दोन्ही कुटुंबे दुरावली जातात, अशा सकारात्मक समुपदेशनामुळे आता 13 कुटुंबे एकत्र आली आहेत.

घरात होणार्‍या लहानसहान भांडणांमुळे सहा वर्षांपूर्वी लग्‍न झालेल्या आणि मागील तीन वर्षांपासून वेगळे राहात असलेल्या सिद्धार्थ कणकोणकर आणि त्यांची पत्नी तसेच सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या जुबेर मुल्‍ला आणि शाहीन मुल्‍ला यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात दावा केला होता. मात्र, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशनानंतर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.