Mon, May 27, 2019 00:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशी दारूही होणार पॅकबंद; चढणार रंग!

देशी दारूही होणार पॅकबंद; चढणार रंग!

Published On: Apr 17 2018 2:27AM | Last Updated: Apr 17 2018 2:27AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

अवैध देशी दारुला पायबंध घालण्यासाठी या दारुलाही रंगीत करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. द डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही मागणी केली आहे. तसेच यापुढे देशी दारुही पॅकबंद बाटलीतच दिली जाणार आहे. 

द डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेसोबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली. विभागात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सर्व परवाने ऑनलाईन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत देशी दारुच्या रंगाबाबतही या चर्चा करण्यात आली. सध्या देशी दारू पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार विदेशी दारूप्रमाणेच देशी दारूलाही रंग असावा. देशी दारूला रंग असला तर अवैध दारूवर नियंत्रण मिळविणे सोपे जाणार आहे. त्यामुळे त्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. 

यापुढे मद्य पॅकबंद बाटलीतच मिळावे असे निर्देशही उत्पादन शुल्क मंत्र्यांकडून देण्यात आले. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करणार्‍यांवरही नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सीएल-3 देशी दारूच्या दुकानात यापूर्वी खुली दारू उपलब्ध होत होती. त्यामुळे खुलेआम दारूचे सेवन केले जाते. खुल्या दारूमुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास रोखण्यासाठ़ी सीएल-3 परवानाधारक दुकानात दारू पॅकबंद बाटलीत विकण्यात यावी. सीएल-3 व एफएल-2 ही दुकाने सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतच सुरु राहतील असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

अवैध दारू निर्मिती कुठे होते याचा शोध घेऊन या व्यवसायाला आळा घालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने ग्रामरक्षक दलास सहकार्य करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली.

मुंबईतील मद्यपींना रोखा

मुंबईतील काही भागांमध्ये मद्यविक्री केंद्रासमोर तसेच सार्वजनिक जागेत खुलेआम मद्यप्राशन केले जात असल्याने सामान्य जनतेला होणारा नाहक त्रास थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील प्रतापनगर, अंधेरी पुर्व तक्षिलाजवळ तसेच शिवाई मैदान त्याचबरोबर मुंबईच्या अनेक भागांतील दुकानांसमोरच मद्यपी मद्यसेवन करत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी येत असल्याचेही वायकर यांनी पत्रात नमुद केले आहे.

Tags : Mumbai, country liquor, shout be sell, Bottles, Mumbai news,