Wed, Aug 21, 2019 19:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फरार तोतये आयकर अधिकारी अटकेत

फरार तोतये आयकर अधिकारी अटकेत

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

सांताक्रूज येथे राहणार्‍या एका व्यापार्‍याच्या पत्नीची आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक करणार्‍या एका टोळीचा सांताक्रूज पोलिसांनी पर्दाफाश केला. फरार असलेल्या पाचही तोतया आयकर अधिकार्‍यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. या टोळीने अक्षयकुमारचा स्पेशल 26 हा चित्रपट पाहिल्यानंतर मुंबईसह ठाणे ग्रामीण परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली.

फैज कादर काझी (48), मानव सुनील सिंग (19), सोहेब मंसुर मुन्शी (19), सलीम ऊर्फ साहिल फिरोज अन्सारी (21) आणि इम्रान मुन्ना अली (25) अशी या पाच जणांची नावे आहेत. सध्या ते सर्व जण पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्यवसायाने व्यापारी असलेले तक्रारदार सांताक्रूज परिसरात त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. 26 जुलैला तक्रारदार हे नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी घरात त्यांची पत्नी एकटीच होती. यावेळी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या घरी पाच जणांच्या एका टोळीने प्रवेश केला. त्यांना स्वतःचे आयकार्ड आणि कारवाई करण्याचे वॉरंट दाखवून आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी केली. 

त्यानंतर या पाच जणांनी त्यांना सर्व सोन्याचे दागिने आणि इतर महागड्या वस्तू एकत्र जमा करण्यास सांगितले. त्यांनी सर्व दागिने दाखवून दागिने खरेदी करताना जीएसटी आणि व्हॅट असलेले बिल दाखविले. कारवाईदरम्यान त्यांना आपण पकडले जाण्याची भीती वाटू लागल्याने त्यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपये मागितले. बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना एक हजार रुपये चहापाण्यासाठी द्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर एक हजार रुपये घेऊन ते सर्वजण पळून गेले होते.

शहानिशा केल्यानंतर त्यांच्या घरी आलेले अधिकारी बोगस अधिकारी असल्याचे उघडकीस आले. या आरोपींचा शोध सुरू असतानाच 25 ऑगस्टला अशाच एका गुन्ह्यांत काशिमिरा पोलिसांनी पाच जणांच्या एका टोळीला अटक केली. या टोळीने एका इस्टेट एजंटच्या घरात घुसून आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून इस्टेट एजंट आणि त्याची पत्नीला घातक शस्त्रांच्या धाकाने बांधून ठेवले. त्यानंतर कॅश आणि सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज पळवला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत त्यांनी सांताक्रूज येथेही अशाच प्रकारे कारवाईच्या नावाने लूटमारीची योजना बनविल्याचे निष्पन्न झाले होते. 

सांताक्रूज पोलिसांनी त्याचा ताबा मिळावा यासाठी तेथील लोकल कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाकडून परवानगी मिळताच शनिवारी या पाच जणांना सांताक्रूज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.