Wed, Jul 24, 2019 06:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राख्यांच्या किमती यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या

राख्यांच्या किमती यंदा 30 टक्क्यांनी वाढल्या

Published On: Aug 20 2018 11:15AM | Last Updated: Aug 20 2018 11:15AMमालाड : प्रतिनिधी

रक्षाबंधन सण काही दिवसांवरच येवून ठेपल्याने भायखळ्यातील राखी बाजार आकर्षक, रंगबेरंगी, मनमोहक राख्यांनी सजला आहे. यंदा किमती 20 ते 30 टक्के वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बाजारात 5 ते 250 रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. भायखळ्यातील होलसेल राखी बाजार हा अत्यंत प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ग्राहक इथे राखी खरेदी करण्यासाठी येतात. लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या शक्तिमान, बाहुबली, बालगणेश, छोटा भीम, हनुमान, वर्ल्ड कप, मिकी माऊस आणि लाईटच्या राख्यांना मागणी अधिक आहे.

जरीची राखी, चंदन राखी, मोती राखी, नाण्याची राखी या नवीन राख्या यंदा उपलब्ध असून त्यांची किमत 40 ते 70 रुपयांपर्यंत आहे. नक्षीकाम राख्या कलकत्ता येथील काही भागातून मुंबईत मागवल्या जातात. बंगालमधून मागवण्यात येणार्‍या जरीच्या राख्यांची किंमत 60 रुपये इतकी आहे. गोंडा, राम, फुल, स्टीलच्या जुन्या प्रकारच्याही राख्या विक्रीस ठेवल्या आहेत. सोनेरी रंगाच्या, देवतांचे फोटो असलेल्या राख्या लक्ष्य वेधून घेत आहेत. 80 ते 250 रुपयांना या राख्या उपलब्ध आहेत. फार पूर्वीपासून भायखळ्यातील स्थानिक नागरिक राखी बनवण्याचा व्यवसाय करतात. इतर राज्यांतूनही राख्यांना मागणी असते.