Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा खर्च 37 कोटींनी वाढला!

बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा खर्च 37 कोटींनी वाढला!

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:14AMमुंबई : राजेश सावंत

विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर हॉस्पिटलमधील बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कंत्राटदारावर करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामाला 186 कोटी रुपये खर्च येईल, असा पालिकेने अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम तब्बल 20.70 टक्के चढ्या भावाने देण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालय बांधण्याचा खर्च 37 कोटी रुपयाने वाढला आहे. 

कूपर हॉस्पिटलच्या आवारात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबई महापालिकेने चौथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. यासाठी पाच मजली नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीचे संरचनात्मक आराखडे व कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी शशी प्रभू व असोसिएट यांची नेमणूक करण्यात आली होती. 

त्यानुसार या इमारतीच्या बांधकामाला 186 कोटी 99 लाख  77 हजार रुपये इतका खर्च येईल, असा अंदाज काढण्यात आला होता. त्यामुळे अंदाजापेक्षा कमी किमतीत इमारतीचे बांधकाम होईल, असे अपेक्षित होते. पण निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी 20.70 ते 29.70 टक्के जादा दराने कंत्राट भरले. त्यामुळे इमारत बांधण्याचा खर्च तब्बल 37 कोटी रुपयाने वाढून 223 कोटी 17 लाख रुपयांवर गेला. त्यामुळे पालिकेतील अधिकार्‍यांचेही डोळे चक्रावले आहेत. 

शशी प्रभू यांच्यासारख्या वास्तुविशारदाचे अंदाज कधीच चुकू शकणार नाहीत. मग कंत्राटदारांच्या व प्रभू यांच्या इमारत बांधकाम दरात तफावत का? वास्तविक तळमजला अधिक 5 मजले या इमारतीचा बांधकाम खर्च 100 ते 110 कोटी रुपये व अन्य 20 कोटी रुपयांचा खर्च असा 130 ते 140 कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित होते. पण हा खर्च 83 कोटी रुपयाने वाढल्याचे मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. परंतु पालिका प्रशासनाने बांधकाम खर्च कमी न करता चढ्या भावाने कंत्राट देऊन, कंत्राटदारांवरच करोडो रुपयांची उधळपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतही घोळ झाल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाचा घेतलेला हा निर्णय स्थायी समिती रोखणार का ? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.