Wed, May 22, 2019 20:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सेल्फी’श मुंबईकरांना आवरा!

‘सेल्फी’श मुंबईकरांना आवरा!

Published On: Mar 15 2019 10:40AM | Last Updated: Mar 15 2019 10:40AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मी टॅक्सीचालक चर्चगेट वरून माहीम ला जात असताना टॅक्सीवर या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आणि टॅक्सीचे नुकसान झाले. मात्र पॅसेंजर सुखरूप आहे. दोन मिनिटे डोळ्यासमोर साक्षात मृत्यू दिसल्याचे टॅक्सीचालक मोहम्मद अंसारी म्हणाले.

मी कामाहून घरी जाताना याच पुलाच्या पायर्‍या चढत होतो. त्याच वेळी पुलाचा काही भाग कोसळला. मी तातडीने पुलाखाली धावलो. लोकांना सोबत घेतले आणि पोलिसांच्या वाहनातून 8 जणांना जीटी रुग्णालयात दाखल केले असे नितीन यादव यांनी सांगितले.

पूल कोसळताच अनेक हात मदतीला धावले. अत्यावश्यक सेवांची वाट न  बघता तो ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. हळूहळू बघ्यांचीच गर्दी वाढू लागली आणि ती हटवताना पोलिसांनाही कष्ट पडले. अनेकांनी नागरिक सेल्फी काढण्यात दंग झाले होते. काही विक्षिप्त तर पूल कोसळला त्याच ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्यात दंग होते. शेवटी त्यांना पोलिसांनीच समज दिली. शेजारी असलेल्या भेळ वाल्याकडून भेळ घेत ती खाण्यात गुंग असलेले दोन तरुण घटना स्थळी भेळ खात खात चौकशी करू लागले. त्यांनाही लोकांनी पिटाळले.

अनेक नागरिकांची पाकिटे व मोबाईल चोरण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू होता. अनेक जण उभ्या असलेल्या पोलिसांकडे आपल्या तक्रारी देण्यासाठी येत होते. त्यामुळे पोलिसांकडून घटनास्थळी बॅरीकेड्स लावण्यात आले. 

पादचारी पुल पडल्यानंतर काही अतिउत्साही तरूणांनी पुलावर धाव घेतली. ही घटना पुलावरून बघण्यासाठी गर्दी होऊ लागताच त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले.