होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मी निर्दोष! राहुल गांधींनी आरोप फेटाळले

मी निर्दोष! राहुल गांधींनी आरोप फेटाळले

Published On: Jun 12 2018 11:50AM | Last Updated: Jun 12 2018 12:14PMभिवंडी : वार्ताहर

महात्मा गांधी यांच्या हत्येत आरएसएसचा सहभाग असल्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 6 एप्रिल 2014 रोजी भिवंडी येथील प्रचारसभेदरम्यान वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचं न्यायालयात स्पष्ट केले आहे. आरएसएसचे शहर पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीसाठी राहुल गांधी मंगळवार, 12 जून रोजी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायाधीश ए. आय. शेख यांनी त्यांच्यावरील दोषारोप पत्र वाचून दाखवत ते मान्य असल्याबाबत विचारले असता राहुल यांनी आरोप फेटाळून लावले. 

राहुल यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी सदर सुनावणी समरी ट्रायल बेसवर न घेता समन्स ट्रायलवर घ्यावी अशी मागणी केली असता त्यास न्यायालयाने मंजुरी दिली असून, पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. फिर्यादी राजेश कुंटे यांचे वकील अ‍ॅड. नंदू फडके यांनी या याचिकेसंदर्भात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात सदर सभेत केलेले भाषण आपणच केल्याबाबतचे सत्यप्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ते राहुल गांधी यांनीच दाखल केले आहे का? याबाबत विचारणा करणारा अर्ज दाखल केला आहे. त्यावर राहुल यांच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. त्यावर 10 ऑगस्ट रोजीच निर्णय न्यायालय देणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. नंदू फडके यांनी दिली. 

तत्पूर्वी, राहुल गांधी सुरुवातीला मुंबई-नाशिक बायपास रस्त्यावरील वडपे येथील ग्रँड बी या हॉटेलमध्ये थांबले. तेथे स्थानिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांचा ताफा भिवंडी न्यायालयाकडे आला. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सुरक्षा यंत्रणेवर फिर्यादी नाराज 

राहुल गांधी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणारे राजेश कुंटे यांनी या केस संदर्भात पोलीस प्रशासन सुरक्षेच्या नावाखाली आरोपीस महत्व देत असून एकीकडे माझ्यासह माझ्या वकिलांची तपासणी होत असताना आरोपी राहुल गांधी व त्यांच्या सोबत आलेल्या सहकार्‍यांची कोणतीही तपासणी होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत त्या बाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले. मागील वेळेस सुद्धा या केससंदर्भात राहुल भिवंडी न्यायालयात आले असता त्यावेळी फिर्यादी राजेश कुंटे यांना न्यायालयापासून एक किलोमीटर अंतरावरून चालत गर्दीतून न्यायालयात यावे लागले होते त्याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार सुद्धा केली होती. परंतु त्यावरून कोणताही बोध न घेता पुन्हा पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीस महत्व देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप कुंटे यांनी केला आहे.