Sun, Mar 24, 2019 16:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी

Published On: Apr 26 2018 7:09PM | Last Updated: Apr 26 2018 7:09PMमुंबई :  पुढारी ऑनलाईन

येत्या मे महिन्यात विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. आघाडी संदर्भात काँग्रेस सोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद-लातूर-बीड, चंद्रपूर  आणि अमरावती  या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विधानपरिषदेसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या जागा वाटपासाठी येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षात चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या नेत्यांसोबत अजित पवार, धनंजय मुंडे आणि मी स्वतः चर्चा केली असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. 

येत्या दोन दिवसात राष्ट्रीय पातळीवर चर्चा होवून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक, परभणी -हिंगोली आणि रायगडची जागा आधी राष्ट्रवादीने लढवली आहे .पण सध्या लातूर मध्येही राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चेनेनंतर हा प्रश्न सुटेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा घेतलेल्या निर्णयावर शिवसेना कायम राहते का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शिवसेनेला कोपरखळी लगावली. शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. पण ते या निर्णयावर कायम राहतील असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या  सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे ही अंतिम तारीख आहे.  तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेत रिक्त होणाऱ्या जागा पुढील प्रमाणे – भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक), भाजपचे उद्योग राज्यमंत्री  प्रवीण पोटे (अमरावती)

Tags : maharashtra, congress, NCP, legislative council, election 2018, sunil tatkare, ajit pawar