Thu, Sep 19, 2019 03:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचा १७, तर भाजपचा ६ राज्यात चक्क 'भोपळा'; 'या' राज्यात भाजपला एक टक्काही मते नाहीत! 

काँग्रेसचा १७, तर भाजपचा ६ राज्यात चक्क 'भोपळा'; 'या' राज्यात भाजपला एक टक्काही मते नाहीत! 

Published On: May 24 2019 3:37PM | Last Updated: May 25 2019 2:09AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अत्यंत चुरशीने गेल्या दोन महिन्यांपासून रंगलेल्या राजकीय रणकंदनाला काल (ता.२३) पूर्णविराम मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्सुनामीमध्ये काँग्रेस भुईसपाट झाली. मरणासन्न अवस्थेत गेलेल्या काँग्रेसला मोदी त्सुनामीने गलितगात्र केल्याने तब्बल १७ राज्यांमध्ये त्यांना खातेही उघडता आले नाही.

दुसरीकडे देशात एकहाती सत्ता मिळवूनही भाजपची दक्षिणेत कर्नाटक वगळता धुळधाण उडाली. भाजपलाही सहा राज्यांमध्ये भोपळा वाट्याला आला. भारतीय जनता पक्षाला आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, मेघालय, मिझोराम, सिक्कीम राज्यात शून्यावरच राहावे लागले. 

देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच काँग्रेसची धुळधाण उडाली असून तब्बल १७ राज्यांमध्ये खातेही खोलता आलेले नाही. भाजपप्रणित एनडीएने ३५० जागांवर विजय मिळवला.काँग्रेसप्रणित यूपीएला फक्त ८२ जागांवर विजय मिळवता आला. अन्य पक्षांना १०६ जागा मिळाल्या. 

काँग्रेसला तब्बल १७ राज्यांमध्ये भोपळाही फोडता आला नाही. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दिव आणि लक्षद्वीप या ठिकाणी काँग्रेस खातेही खोलू शकली नाही. 

भाजपने हिंदी राज्यांमध्ये दमदार कामगिरी करून विजयी घौडदौड कायम ठेवली असली तरी आंध्रमध्ये भाजपाला एक टक्काही मते मिळालेली नाहीत. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पाँडिचेरी या चार राज्यांमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. 

भाजपाला उत्तर प्रदेशात ५० टक्क्यांच्या घरात मते मिळाली. तर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली, चंडीगड व अरुणाचलमध्ये भाजपने पन्नाशी ओलांडत मते प्राप्त केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपला ४० टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली आहेत. आंध्रमध्ये भाजपला एक टक्काही मते मिळाली नाहीत. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये ४६ टक्के मते मिळाली. तेलंगणमध्ये २० टक्के तर केरळमध्ये १३ टक्के, तर ओडिशात ३८ टक्के मिळाली. महाराष्ट्रात भाजपला २७ टक्के, तर पंजाबमध्ये १० टक्के, ३५ टक्के आसाममध्ये, २४ टक्के मते बिहारमध्ये मिळाली.